जानोरी येथील घरफोडीत 53,400 रुपयांचा ऐवज लंपास

दिंडोरी : प्रतिनिधी
घराच्या दर्शनी भागाच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील कपाटातील सुवर्णलंकार व रोकडसह 53 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याबाबत दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत माहिती अशी, दिनेश बबन विधाते (रा. शिवाजीनगर, भानगडवाडी, जानोरी) पत्नी व मुलांसह वास्तव्यास आहेत. त्यांच्यावर मानसोपचार सुरू असल्याने ते औषधे घेऊन रात्रीच्या सुमारास झोपले होते. त्यावेळी पत्नी व मुले ओझर येथे यात्रेला दरवाजाला बाहेरून कुलूप लावून गेले होते. यात्रा आटोपून रात्री बाराला पत्नी व मुले घरी परतताच त्यांना दरवाजाचे कुलूप तोडलेल्या अवस्थेत दिसले. घरात प्रवेश करताच घरातील वस्तू अस्ताव्यस्त दिसल्या. त्यांनी दिनेश यांना उठविले व घरातील कपाट व इतर ठिकाणी तपासणी केली असता, कपाटातील पाच हजार रुपये रोख व तीन चांदीचे शिक्के गायब असल्याचे निदर्शनास आले. कपाटाशेजारील पिशवीतील 11 हजार रुपये व कानातील टॉप्स व वेलजोड यांची चोरी झाल्याचे दिसून आले, असा एकूण 53 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. तसेच स्कूल बॅग व त्यातील वह्या, पुस्तके, इतर वस्तू घराबाहेर दिसून आल्या. ओझर शिवारात दोन घरांमध्ये चोरी झाल्याचे समजते. दरम्यान, जानोरी परिसरात चोरट्यांमुळे भीतीचे वातावरण आहे. चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *