सिंहस्थासाठी आनंदवलीत ‘बलून बंधार्‍याचा’ प्रस्ताव

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड व अन्य घाटांवरील अमृत स्नानासाठी गोदावरी नदीतील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाने आनंदवली येथे ‘बलून बंधारा’ उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. सुमारे 25 कोटी रुपयांच्या खर्चातून हवेच्या दाबाने कार्य करणार्‍या या रबर बंधार्‍याच्या उभारणीसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
हा बंधारा आधुनिक जपानी तंत्रज्ञानावर आधारित असून, 2 ते 3 मीटर उंचीचा असणार आहे. गंगापूर धरणाच्या प्रवाहावर उभारल्या जाणार्‍या या बंधार्‍यामुळे 16 ते 24 दशलक्ष घनफूट पाणी नियंत्रित करता येणार आहे. रामकुंडात आवश्यक पाण्याची पातळी राखण्यास हा प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
सध्या गंगापूर धरणातून पाणी सोडल्यानंतर ते रामकुंडापर्यंत पोहोचण्यासाठी साडेचार ते सात तासांचा कालावधी लागतो. मात्र, आनंदवली येथे प्रस्तावित बलून बंधारा उभारल्यास फक्त दोन ते अडीच तासांत पाणी रामकुंडात पोहोचू शकणार आहे. यामुळे विसर्गाचे अचूक नियोजन करता येणार असून, पाणी वाया जाण्याचे प्रमाणही कमी होणार आहे. जलसंपदा विभागाने या प्रकल्पासाठी आवश्यक तांत्रिक अभ्यास पूर्ण केला असून, प्रस्ताव मंजुरीसाठी लवकरच सादर करण्यात येणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पाण्याचा शाश्वत आणि नियोजित पुरवठा करण्याच्या दृष्टीने हा बंधारा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

बलून बंधार्‍याचे फायदे

पारंपरिक काँक्रीट बंधार्‍याच्या तुलनेत कमी खर्च, लवकर उभारणी शक्य, हवेचा दाब कमी-जास्त करून पाण्याचा प्रवाह नियंत्रित, पावसाळ्याचे अतिरिक्त पाणी साठवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे.

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी अपेक्षित आहे. पावसाळ्यानंतर उभारणीचे काम सुरू होईल. प्रस्ताव पाठवून निविदा प्रक्रिया दिवाळीपूर्वी पूर्ण करणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष काम वेगाने सुरू केले जाईल.
– सोनल शहाणे, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *