वॉटरगेसच्या कामगारांचे मालेगाव पालिकेसमोर आंदोलन



शासनाने निश्चित केलेले वेतन मिळण्याची मागणी

मालेगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य शासनाने निश्चित केलेले किमान वेतन व वेळोवेळी येणारा महागाई भत्ता याप्रमाणे ८ तास कामाचे वेतन कामगारांना वेतन त्वरित लागु करण्यात यावे. या मागणीसाठी मनपाच्या वॉटरगेस या खाजगी ठेकेदारामार्फत काम करणार्‍या घंटागाडी कामगारांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर कचरा भरलेल्या घंटागाड्यांसह धरणे आंदोलन केले. यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती.

मालेगाव महापालिका येथे मे. वॉटरग्रेस प्रोडक्टस या खाजगी ठेकेदारामार्फत काम करणारे घंटागाडी कामगार व चालक हे मालेगाव महापालिका कामगार कर्मचारी संघटनेचे सभासद आहेत. त्यांच्या अनेक कायदेशीर मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यासाठी वेळोवेळी मनपा आयुक्त व वॉटरग्रेस प्रोडक्टस यांना निवेदन देण्यात आले आहे.

या संदर्भात दि. २१ डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी यांनी आठ दिवसात प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र एक महिना उलटूनही कामगारांचे प्रश्‍न मार्गी न लागल्याने संतप्त झालेल्या कामगारांनी थेट कचरा भरलेल्या घंटागाड्यांसह महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन सुरू केले होते.

किमान वेतन त्वरित लागु करावे. सन २०२१-२२ चा बोनस त्वरित अदा करण्यात यावा. पी. एफ. व ई. एस. आय. सी. त्वरीत लागु करण्यात यावे. कामगारांना साप्ताईक सुटटी, सणाच्या भरपगारी सुट्ट्या तसेच पीएलसीएल व एसएल त्वरीत लागु करावा. घंटागाडी कामगारांचा पगार त्यांच्या बँकखातेवर जमा करा आदी मागण्यांसाठी घंटागाडी कामगारांनी मनपा प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे संघटनेचे जिल्हा सचिव तुकाराम सोनजे, तालुकाध्यक्ष रमेश जगताप, तालुका सचिव अजहर खान, तालुका सदस्य पंकज सोनवणे यांनी सागितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *