मनपाच्या भोंगळ कारभारविरोधात बाप्पांना घेऊन आंदोलन

सार्वजनिक नागरी सुविधा समितीने प्रशासनाचे वेधले लक्ष

मालेगाव : प्रतिनिधी
गणेशोत्सव काळात शहरातील मिरवणूक मार्गावरील समस्यांकडे मनपा प्रशासनाचे लक्ष वेधत तसेच त्यांच्या असमाधानकारक कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त करत सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे रामदास बोरसे यांनी डोक्यावर गणपती बाप्पा घेऊन सरदार चौकात आंदोलन केले. यावेळी मनपा अधिकार्‍यांनी दोन दिवसांत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित झाले.
शहरातील गूळ बाजारात केलेले डांबरीकरण पावसामुळे वाहून गेले, ज्यामुळे पुन्हा खड्डे निर्माण झाले. मोकाट जनावरे आणि भटकी कुत्री यांचा वावर वाढल्याने गणेश मूर्तींना हानी पोहोचण्याची भीती आहे. गटारींवरील ढाप्यांच्या अभावामुळे नागरिकांना अपघातांचा धोका आहे. त्यामुळेच बोरसे यांनी आंदोलनाचे हत्यार उपासले होते. आंदोलनाची माहिती मिळताच अतिरिक्त आयुक्त नूतन खाडे, उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक आयुक्त अनिल पारखे, जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे, उपअभियंता शांताराम चौरे आणि स्वच्छता निरीक्षक एकबाल जान मोहम्मद उपस्थित होते. त्यांनी दोन दिवसांत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित झाले.
यावेळी देवा पाटील, भालचंद्र खैरनार, श्याम भावसार, देवेंद्र कुलकर्णी, हर्षद गुप्ता, चेतेश आसेरी, तुषार छाजेड, अक्षय महाजन, राहुल बच्छाव, पप्पू दुबे, जिगा आमीन, तुषार सोनगरा, किरण पाटील, नीलेश सोनवणे आणि हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलकांच्या मागण्या
आंदोलकांनी मागणी केली की, मोकाट जनावरांचे मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि समस्यांचे त्वरित निराकरण करावे, अन्यथा गणेश विसर्जन करणार नाही, असा इशारा दिला होता. त्यासंदर्भात दीड महिन्यांपूर्वी निवेदन देत मोकाट जनावरे, गटारींवरील ढाप्यांचा अभाव, निकृष्ट डांबरीकरण आणि साफसफाईच्या कमतरतेबाबत तक्रारी नोंदवल्या होत्या. मात्र, केवळ 25 टक्के समस्यांचे निराकरण झाले असून, 75 टक्के समस्या कायम आहेत.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *