वाहनतळांच्या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधांची पूर्तता करा

जिल्हाधिकारी जलज शर्मा : कुंभमेळा आढावा बैठक

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे आगामी कुंभमेळ्यासाठी येणार्‍या भाविकांच्या सुविधेसाठी वाहनतळांची (पार्किंग) सुविधा तयार करतानाच, तेथे भाविकांना आवश्यक मूलभूत सोयीसुविधा उपलब्धतेसाठी नियोजन करून कामे तत्काळ सुरू करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात गुरुवारी (दि.11) कुंभमेळ्यासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे (नाशिक), पवन दत्ता (इगतपुरी), सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय पालवे, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, चंद्रकांत खांडवी, रेल्वे विभागाचे श्री. शर्मा आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहनतळांसाठी आदर्श आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी. त्यासाठी आवश्यक भूसंपादनासाठी महसूल विभागाने परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत. तसेच कुंभमेळ्यासाठी विविध विभागांना आवश्यक क्षेत्राची मोजणी प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) नाशिक आणि त्र्यंबकेश्वरकडे जाणार्‍या भाविकांच्या सुविधेसाठी आवश्यक बस, त्यांची रंगसंगती, वाहनतळ यांची निश्चिती करावी. जेणेकरून भाविकांना इच्छितस्थळी जाणे सुलभ होईल. पोलिस विभागाने कसबे सुकेणा, खेरवाडी, ओढा, घोटी, देवळाली कॅम्प, नाशिकरोड रेल्वे स्टेशनपासून नाशिक व त्र्यंबकेश्वरकडे जाणारे रस्ते निश्चित करून या रस्त्यांवर वाहतुकीचे व गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी आराखडा तयार करावा. नदीकिनारी घाट बांधण्याच्या कामास गती द्यावी. रेल्वे विभागाने त्यांना आवश्यक असणारी जागा व त्यासाठी लागणारी रक्कम याची माहिती द्यावी, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी कुंभमेळ्यासाठी रेल्वे, पोलिस दल, सार्वजनिक बांधकाम, महानगरपालिकेमार्फत सुरू असलेली विकासकामे, नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे बांधण्यात येणार्‍या घाटांच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. महानगरपालिका आयुक्त खत्री यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *