आमदार डॉ. आहेर यांनी दिल्लीत मांडले शेतकर्यांचे गार्हाणे
चांदवड : वार्ताहर
नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी कांद्याला प्रतिक्विंटल 500 रुपये थेट अनुदान द्यावे, अशी आग्रही मागणी चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दिल्ली येथे केली. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेऊन डॉ. आहेर यांनी शेतकर्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा केली.
केंद्रीय मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात आमदार डॉ. आहेर यांनी नमूद केले की, नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादनात देशात अग्रेसर आहे. मात्र, सध्या कांद्याचे बाजारभाव प्रचंड कोसळले आहेत.
एका क्विंटल कांद्याच्या लागवडीसाठी शेतकर्याला सुमारे 1,600 रुपये खर्च येतो, पण प्रत्यक्षात बाजारात 500 ते 900 रुपये इतकाच दर मिळत आहे. हा दर उत्पादन खर्चापेक्षाही कमी असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ही गंभीर परिस्थिती त्यांनी कृषिमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्याचप्रमाणे, नव्याने सुरू करण्यात आलेल्या “ VB – G RAMG ” (विकसित भारत रोजगार आणि अजीविका हमी अभियान ग्रामीण) अंतर्गत कांदा पिकाचा समावेश करून लागवडीपासून कापणीपर्यंत शेतकर्यांना थेट लाभ मिळेल अशी तरतूद करावी, अशी विनंतीही त्यांनी केली.
या मागण्यांवर केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली असून, संबंधित अधिकार्यांसोबत तातडीची बैठक घेऊन योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. याप्रसंगी आमदार डॉ. आहेर यांच्यासोबत भाजपा तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, चांदवडचे उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, बाजार समितीचे संचालक योगेश ढोमसे, अॅड. शांताराम भवर, देवीदास आहेर, अनिल कोठुळे, राजू पाटील, गणेश महाले यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकरी हितासाठी प्रमुख मागण्या
♦ कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल 500 रुपये थेट अनुदान त्वरित देण्यात यावे.
♦ कांदा निर्यात सुलभ व सातत्यपूर्ण राहण्यासाठी निर्यात धोरणात आवश्यक सुधारणा कराव्यात.
♦ ’ VB – G RAMG ’ अभियानांतर्गत कांदा पिकाचा समावेश करून शेतकर्यांना लागवडीपासून कापणीपर्यंत थेट लाभ द्यावा.
♦ उत्पादन खर्च आणि बाजारभाव यातील मोठी तफावत दूर करून शेतकर्यांना आर्थिक आधार द्यावा.
Provide direct subsidy of Rs 500 to onion producers