प्रभाग क्रमांक 27
मनपा निवडणुकीची चाहूल लागताच शहरातील राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने समसमान ताकद दाखवत प्रत्येकी दोन नगरसेवक निवडून दिले असले, तरी राज्यातील राजकीय फेरबदलांमुळे आज या प्रभागात सर्वच नगरसेवक सत्ताधारी पक्षांमध्ये एकवटले आहेत. विकासाच्या आश्वासनांनी भरलेल्या या प्रभागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा रखडलेला प्रश्न, अंबड गावातील जीर्ण शाळेची दुरवस्था, तर दुसरीकडे कोविड काळात नागरिकांसाठी चालवलेले सामाजिक उपक्रम अशा विविध अंगांनी राजकारण आणि जनसेवा यांचा संगम दिसतो. मात्र गेल्या तीन वर्षांपासून प्रतिनिधी नसल्याने रस्त्यांची झालेली दुरवस्था, कचर्याचे वाढलेले प्रमाण आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील उदासवाणे चित्र यामुळे नागरिकांचा रोष वाढताना दिसत आहे. आगामी निवडणुकीत हा पारंपरिक भाजप-शिवसेना बालेकिल्ला कायम राहील का, की मतदार नव्या पर्यायाकडे वळतील. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विकासकामांबरोबरच जनसेवेवर भर
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत या प्रभागातून भाजपचे दोन तर शिवसेनेचे दोन नगरसेवक निवडून आले. राज्यात घडलेल्या राजकीय हालचालीमध्ये सध्या या प्रभागात सर्वच नगरसेवक सत्ताधारी पक्षांमध्ये आहेत. विकास कामांच्या बाबतीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 25 वर्षापासून रखडलेला पुतळ्याचा प्रश्न ,अंबड गावातील महापालिका शाळेची जीर्ण इमारत नूतनी करण करण्याचे काम माजी नगरसेवक राकेश दोंदे यांनी माग लावला. किरण गामणे दराडे यांनी बाळासाहेब ठाकरे दवाखान्यामार्फत कोविड काळात केलेली सेवा व ना नफा ना तोटा तत्वावर चालू केलेली रक्त तपासणी लॅब ही सर्व सामान्यांसाठी लाभदायी झालेली असून सिटी स्कॅन एम आर आय या सारख्या अनेक सुविधा मिळत असल्याने सर्वसामान्यासाठी उपयुक्त ठिकाण म्हणून प्रसिद्ध तसेच कोरोना काळात अनेक रुग्णाचे बिल कमी करण्याच्या पद्धतीने चर्चेतील नगरसेवक म्हणून ओळख निर्माण केली. चंद्रकांत खाडे यांनी अश्विन नगर परिसरात विकास कामे केलीत. कावेरी घुगे यांनी शक्ती पिठाची निर्मिती करून प्रभागात भक्तिमय वातावरण निर्माण केले. निसटता पराभव झालेल्या सोनल निकुंभ यांनी कोरोना काळात रुग्णसेवा केली.
बालेकिल्ला कोण राखणार?
गेल्या तब्बल तीन ते साडेतीन वर्षांपासून महापालिकेत नगरसेवक नसल्यामुळे प्रभागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. महापालिकेला सर्वात मोठ्या प्रमाणावर टॅक्स देणारी अंबड औद्योगिक वसाहतीतील रस्ते मोठ्या प्रमाणावर खराब झाले आहेत. घरकुल योजना परिसरात मोठ्या प्रमाणावर कचर्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना सहन करावा लागत आहे.प्रभागात सध्या सर्वच पक्षांमधून इच्छुकांची संख्या जास्त आहे मात्र भाजपमध्ये इच्छुक सर्वात जास्त असल्याने ऐन निवडणुकीत काही जणांनी पक्ष बदलला तर काही विशेष म्हणता येणार नाही. भाजप, शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून प्रभागाची ओळख आहे मात्र हा बालेकिल्ला राखण्यात किती यश मिळेल हे येणारा काळच सांगेल.
विद्यमान नगरसेवक

चंद्रकांत खोडे

राकेश दोंदे

कावेरी घुगे

किरण गामणे-दराडे
प्रभागाची व्याप्ती
सह्याद्री नगर अश्विन नगर संभाजी स्टेडियम मोरवाडी गाव आंबडगाव अंबड एमआयडीसी दत्तनगर,कारगील चौक,चुंचाळे घरकुल योजना
मतदार संख्या
♦ लोकसंख्या 51,565
♦ अ.जाती 10775
♦ अ. जमाती 5508
इच्छुक उमेदवार
प्रियंका राकेश दोंदे,चंद्रकांत खाडे,किरण गामणे दराडे,कावेरी घुगे,सोनालीराजे पवार, शेखर निकुंभ,सोनल निकुंभ,विशाल डोखे ,गायत्री गांगुर्डे डोखे, ज्योती कवर,सुनील जगताप,अश्विनी खाडे,अक्षय परदेशी,पुनम परदेशी,मंदा दातीर,शरद दातीर,रामदास (तात्या) दातीर,किरण राजवाडे,राहुल भुजबळ,उत्तम काळे,हर्षा फिरोदिया,हिंमतराव पाटील,अमोल सोनवणे,तानाजी फडोळ,शोभा फडोळ,प्रशांत खरात,हर्षल चव्हाण,पुष्पा राठोड,रुपाली काटे,पुजा पाटोळे,विजय जमदाडे
झालेली विकास कामे
♦ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा
♦ अंबड गाव मनपा शाळा
♦ घरकुल योजना रस्ते
♦ हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना
♦ जलवाहिनी
♦ अंबड गाव अमरधाम नूतनीकरण
रखडलेली कामे
♦ छत्रपती संभाजी राजे स्टेडियम
♦ अंबड गावातील छ. शिवाजी महाराज पुतळा
♦ रस्ते काँक्रीटीकरण
♦ चुंचाळे पाणी प्रश्न
नागरिक म्हणतात…
गेल्या तब्बल तिन वर्षांपेक्षा जास्त काळापासून महापालिकेत प्रशासक राजवट असल्याने अधिकार्यांना कुणाचा धाकच राहिला नाही. यामुळे प्रभागात दिवसेंदिवस समस्या वाढतच आहेत. नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
– राकेश परदेशी

सर्व नगरसेवक माजी झाल्याने अधिकारी वर्गात धाक उरला नाही. प्रभागात रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याने दुचाकी वाहनचालकांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
– विलास झोले

छ. राजे संभाजी स्टेडियमचे काम गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेले आहे. यामुळे व्यायामप्रेमींमध्ये नाराजीचा सूर आहे. यासोबतच इनडोअर स्टेडियम देखील बंद असल्याने परिसरातून खेळाडू घडणे अवघड झाले आहे.
– रवी वाघ

चुंचाळे घरकुल योजनेमध्ये समस्यांचा महापूर आला आहे. परिसरात ठिकठिकाणी कचर्याचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येत आहे. यामुळे परिसरात साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
– विजय विसपुते