लोकप्रतिनिधी सेवक की सत्ताधीश?

सत्ता खुर्चीची नाही, ती जनतेच्या विश्वासाची असते,
नेता तोच खरा, जो सेवेत आपले आयुष्य झिजवत असतो…
लोकशाहीची आत्मा एका साध्या पण मूलभूत तत्त्वावर उभी आहे. सत्ता ही जनतेची असते. लोकप्रतिनिधी ही त्या सत्तेची केवळ जबाबदार साधने असतात. तरीही आजच्या वास्तवात हा प्रश्न अधिक ठळकपणे उभा राहतो की लोकप्रतिनिधी खरोखर सेवक म्हणून वागतात की सत्ताधीश बनून जनतेवर अधिराज्य गाजवतात? लोकप्रतिनिधींची निवड ही जनतेच्या विश्वासावर होते. मी तुमचा प्रतिनिधी आहे हे वाक्य मुळात मी तुमचा सेवक आहे या भावनेतून आलेले आहे.
रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता इत्यादी मूलभूत गरजांची पूर्तता करणे, नागरिकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवणे आणि त्यावर उपाय मिळवून देणे, हेच लोकप्रतिनिधीचे खरे कर्तव्य आहे. परंतु जेव्हा अधिकारांची नशा चढते, तेव्हा सेवकाचा सत्ताधीश होण्याचा धोका निर्माण होतो. सत्ताधीश वृत्तीची ओळख स्पष्ट असते, जनतेशी संवाद कमी होतो, प्रश्न विचारणार्‍यांकडे संशयाने पाहिले जाते, टीका म्हणजे वैयक्तिक हल्ला समजला जातो.
विकासाचे निर्णय लोकांच्या गरजांपेक्षा राजकीय फायद्यांच्या चौकटीत अडकतात. अशा वेळी लोकशाहीचा गाभाच डळमळीत होतो. मात्र या सार्‍या प्रक्रियेत नागरिकांची भूमिका काय? हा प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे. लोकप्रतिनिधी सत्ताधीश बनतात, याला फक्त तेच जबाबदार नसतात; अनेकदा नागरिकांची उदासीनताही त्याला खतपाणी घालते. मतदानानंतर आता सर्व काही त्यांचे काम अशी भूमिका घेतली, तर प्रतिनिधींवरचा लोकांचा नैतिक दबाव कमी होतो. खरा नागरिक तोच, जो प्रश्न विचारतो, माहिती मागतो, विकासकामांची गुणवत्ता तपासतो आणि चुकीविरुद्ध आवाज उठवतो. लोकशाहीत प्रश्न विचारणे हा अपराध नसून अधिकार आहे. सभ्य, ठाम आणि तथ्याधारित प्रश्न हे लोकप्रतिनिधींना सेवकाच्या भूमिकेत ठेवण्याचे प्रभावी साधन आहे.
आज सोशल मीडियामुळे नागरिकांच्या हातात नवे व्यासपीठ आले आहे. परंतु केवळ पोस्ट लिहिणे पुरेसे नाही; प्रत्यक्ष सहभाग, स्थानिक प्रश्नांवर एकत्र येणे, बैठकींना हजेरी लावणे आणि प्रशासनाशी संवाद साधणे हीच खरी नागरिकांची भूमिका आहे. लोकप्रतिनिधी सेवक राहतील की सत्ताधीश बनतील, हे शेवटी नागरिकांच्या जागरूकतेवर ठरते. जागरूक नागरिक असतील, तर लोकप्रतिनिधींना नम्र राहावेच लागते. कारण लोकशाहीत अंतिम सत्ता कुणाचीही नसून, ती कायम जनतेचीच असते.
लोकप्रतिनिधी हे जनतेचे प्रतिबिंब असतात. म्हणूनच सक्षम, सजग आणि निर्भीड नागरिक घडले, तर सेवक वृत्तीचे लोकप्रतिनिधी आपोआप घडतील आणि तेव्हाच लोकशाही खर्‍या अर्थाने मजबूत होईल.        –  अफजल पठाण

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *