शालेय विद्यार्थी, पालकांची तारेवरची कसरत
सिडको : विशेष प्रतिनिधी
पाथर्डी फाट्याजवळील नम्रता पेट्रोल पंपावर सीएनजी गॅस भरण्यासाठी दररोज शेकडो रिक्षा आणि चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असून, वाहनधारक तसेच स्थानिक नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
या पेट्रोल पंपालगतच शाळा आणि महाविद्यालय असल्याने सकाळी व दुपारी विद्यार्थ्यांना आणि पालकांना या वाहनांच्या रांगांमधून वाट काढावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांची तसेच पादचार्यांची तारेवरची कसरत सुरू असून, अपघाताचा धोका कायम आहे.
अंबड औद्योगिक वसाहतीकडे जाणारा मुख्य मार्ग म्हणजे पाथर्डी फाटा ते अंबड लिंक रोड हा अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे. या मार्गावरून देवळाली कॅम्प, सिडको आणि अंबडगावसह विविध औद्योगिक भागांकडे वाहने सतत ये-जा करतात. त्यामुळे पंपावर सीएनजीसाठी लागलेल्या रांगा वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण करत आहेत. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत वाहनांची गर्दी कायम राहते.
वाहनधारकांकडून सिग्नल तोडणे, रांगेतून चुकीचे वळणे घेणे अशा प्रकारांमुळे वारंवार किरकोळ अपघात होत असून, काही वेळा वादविवादांच्याही घटना घडतात. शाळा, महाविद्यालय तसेच क्रीडांगण परिसरात 300 ते 400 मीटर लांबीच्या रांगा लागल्याने पादचारी, विद्यार्थी, क्रीडाप्रेमी व ज्येष्ठ नागरिक यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. वारंवार तक्रारी करूनही वाहतूक पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. नागरिकांनी या ठिकाणी वाहतूक शिस्त राखण्यासाठी आणि सीएनजी वाहनांच्या रांगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.