संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या नवी दिल्लीत सुरू आहे. या अधिवेशनात सर्वाधिक जाणवला तो विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा दबदबा. ज्याला आपण ‘हायजॅक’ असे म्हणतो तशा प्रकारे राहुल गांधींनी हे अधिवेशन जणू ‘हायजॅक’ केले. त्यांना उत्तर देता देता सत्ताधारी पक्षाला अनेक हातखंडे आजमावे लागले, तर दुसरीकडे त्यांच्यावर सोडलेल्यांचाही काही प्रभाव पडला नाही. या अधिवेशनातील त्यांचे 52 मिनिटांचे भाषण या देशातील तरुण पिढीला नवी दिशा देणारे ठरले. अगदी उत्स्फूर्तपणे केलेले त्यांचे हे भाषण वक्तृत्वाचा एक उत्तम नमुना होते. त्यात अभ्यास होता, देशाविषयीचे प्रेम होते. आव्हानांना सामोरे जाण्याची मनीषा होती. एकप्रकारे हे भाषण विरोधी पक्षनेत्यापेक्षा देशाला चांगल्या मार्गावर नेण्याची प्रामाणिक इच्छा असलेल्या पंतप्रधानांचे वाटत होते.
या अधिवेशनात अनेक मुद्दे गाजले. विरोधी पक्षाने यावेळी सरकारला वर्तमानात घडलेल्या बाबींवर घेरण्याचे धोरण ठरवले होते. त्यांना माहीत होते की, भाजपा आणि भाजपाचे पंतप्रधान हे काँग्रेसच्या भूतकाळातील बाबींवर उत्तरे देतील. त्यामुळे या भाषणात त्यांनी कुठेही भूतकाळाचा उल्लेख केला नाही. अगदी काँग्रेसने सत्तर वर्षांत कमावलेली आंतरराष्ट्रीय प्रतिमा इपिस्टिन फाइलमुळे धुळीला मिळाली असली, तरी त्यातील आपल्या सहभागाचा उल्लेख त्यांनी टाळला. त्यांनी अगदी आजचे बोला, ही भूमिका निवडली. इपिस्टिन फाइलचा त्यांचा अभ्यास आहे. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींपेक्षा इतर अनेक गोष्टी राहुल गांधी यांना माहीत असण्याची शक्यता आहे. असे असले तरी त्यांनी या प्रश्नावर अजिबात व्यक्तिगत चारित्र्यहनन केले नाही. अशा प्रकारचा मुद्दा जर भाजपाच्या हाती असता तर त्यांनी अगदी काय काय केले असते. अगदी राज्या-राज्यात महिला आयोग वगैरे यांनी पत्रकार परिषद घेऊन, समाजमाध्यमांवर लेखांची मालिका लिहून त्याविषयी लिहिले असते. मात्र, राहुल गांधी यांनी इपिस्टिन फाइलमध्ये ज्यांची नावे आलेली आहेत. ज्यांनी या विकृत गोष्टींमध्ये सहभाग घेतला आहे, त्यांची नावे टाळली आहेत. त्यांनी केवळ देशाचा विचार केला. केवळ यामुळे अमेरिका आपल्यावर कशा प्रकारे दबाव टाकते आहे, हे त्यांनी अगदी सोदाहरण स्पष्ट करून सांगितले. केवळ टीका करून ते थांबले नाहीत, तर अशा स्थितीत काय करायला हवे याच्याही सूचना त्यांनी केल्या. राहुल गांधी यांनी कोरोना येण्याच्या आधीही अनेक महत्त्वपूर्ण सूचना केल्या होत्या. पुढे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी थेट सरकारला पत्र लिहून या गोष्टी राबवायला सांगितल्यानंतर कोरोनाच्या विरोधातील लढा अधिक व्यापक आणि प्रभावी
झाला होता.
राहुल गांधी यांचा मुख्य रोष हा अमेरिकेबरोबर झालेल्या व्यापार करारावर होता. देशाच्या हिताशी तडजोड करणारा करार का आणि कोणत्या दबावामुळे करण्यात आला, असा प्रश्न त्यांनी विचारला. राहुल गांधी आपल्या दौर्यांमध्ये सर्वसामान्य लोकांशी अगदी सहजपणे भेटतात. त्यांना आपलेसे करतात. त्यामुळे ते केवळ साध्या लोकांचे नेते आहेत आणि अगदी जटिल, आंतरराष्ट्रीय बाबींविषयीचे त्यांचे ज्ञान कमी आहे, असा प्रचार केला जात होता. त्यालाही राहुल गांधी यांनी चांगलीच चपराक लावली. त्यांनी व्यापार करारावर बोलण्याआधी सध्याची जागतिक स्थिती अगदी माफक शब्दांत सांगितली. भरपूर अभ्यास असल्याशिवाय अशा प्रकारे सारांश सांगता येत नाही. हा अभ्यास त्यांचा स्वतःचा वाटत होता. हे कोणी लिहून दिलेले आहे असे नव्हते. एखाद्या जबाबदार नेत्याप्रमाणे सर्व घटकांशी चर्चा करून त्यातून निर्माण झालेल्या आकडेवारीचा अभ्यास करून तयार करण्यात आलेले ते एक प्रगल्भ मत होते, हे त्यांच्या भाषणातून शब्दा शब्दागणिक जाणवत होते. देशाचे एकंदरीत स्वरूप, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची असलेली शक्तिस्थळे आणि त्याच्या आधारे करता येईल अशा वाटाघाटी त्यांनी अगदी सोदाहरण स्पष्ट करून दाखवल्या. कोणत्याही आंतरराष्ट्रीय करारामध्ये आपल्या देशाचे हित जपणे अत्यंत महत्त्वाचे असते, हे त्यांनी दाखवून दिले. त्याचवेळी त्यांचा देशाच्या सर्वसामान्य लोकांशी, इथल्या उद्योगधंद्यांशी, लहान लहान व्यवसायांबरोबर किती घनिष्ठ संबंध आहे, हेही दिसून आले. इतका सूक्ष्म अभ्यास असलेला नेता हा या देशाचे भविष्य घडवू शकतो, हा विश्वास त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला. राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुखांच्या अप्रकाशित पुस्तकातल्या उतार्याचा संदर्भ देत संसदेचे कामकाज चांगलेच रंगतदार केले. त्यांना रोखण्यासाठी सत्ताधारी पक्षाने जंग जंग पछाडले. अगदी लोकसभा अध्यक्षांसारख्या जबाबदार व्यक्तीलाही पंतप्रधानांना महिला खासदारांकडून धोका आहे, असे विधान करावे लागले. काही इकडच्या तिकडच्या आपली निष्ठा व्यक्त करण्याची संधी शोधणार्या खासदारांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्याची समाजमाध्यमावर प्रसिद्धी करण्यात आली. राहुल गांधी यांना काही बोलता येत नाही. त्यांचा अभ्यास नसतो, ही गेल्या काही वर्षांपासून चालवण्यात आलेली ओरड पुन्हा सुरू करण्यात आली. असे अनेक प्रकार जरी केलेले असले तरी राहुल गांधी यांनी या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपलाच दबदबा राहील हे पाहिले. अगदी विरोधी खासदारांनाही थेट संयुक्तरीत्या पत्रकारांशी बोलण्याचे आवाहन करून त्यांच्या आरोपातील हवाच काढून घेतली. रिजिजू यांच्या विधानावर हसत-खेळत राहुल गांधी यांनी जे केले, त्यातून त्यांच्यातील एका प्रगल्भ नेत्याची चुणूक दिसून आली. या देशावर प्रेम करणारा, देशातील सर्व घटकांची काळजी घेणारा, देशाच्या विकासाच्या विविध योजना असलेला, देशाची बाजू सहजसोप्या शैलीत कोणत्याही मदतीशिवाय मांडू शकणारा हा नेता आहे, याची जाणीव राहुल गांधी यांनी सार्या देशाला करून दिली. राहुल गांधी यांना अनेक परदेशी विद्यापीठे थेट व्याख्यान्याकरिता का बोलवत असावेत आणि तेही जगातल्या पत्रकारांशी आणि विद्यार्थ्यांशी कसा सहजसोपा संवाद साधत असतील, याची जाणीव या देशातल्या लोकांना त्यांनी या चार दिवसांत करून दिली. संसदेची प्रतिष्ठा जपण्याची भाषा, कोणाविषयीही कटुता न ठेवता आपला मुद्दा ठळकपणे मांडण्याची त्यांची हातोटीही कौतुकाचा विषय ठरली.
Rahul Gandhi’s dominance