60 लाखांचा मुद्देमाल जप्त, 29 आरोपींवर गुन्हा
सिडको : विशेष प्रतिनिधी
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाथर्डी गाव शिवारात फ्लायिंग कलर्स शाळेसमोरील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार क्लबवर गुन्हे शाखा युनिट दोनने छापा टाकत सुमारे 60 लाख 90 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत 29 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जुगाराच्या क्लबवर टाकलेल्या छाप्यामुळे अवैधधंदे करणार्यांचे धाबे दणालले आहे.
गुन्हे शाखा युनिट-दोनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरिक्षक हेमंत तोडकर आणि त्यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकला. वसीम अन्वर शेख आणि टिप्पर गँगचा म्होरक्या आणि गेल्या आठवड्यात द्वारका परिसरातील काठेगल्ली परिसरात असलेल्या अनधिकृत सातपीर दर्गा प्रकरणी दंगल घडवून आणल्याचा आरोप असलेला समीर पठाण या दोघांनी मिळून हा जुगार अड्डा सुरू केला होता. अड्ड्यावर तीनपत्ती जुगार खेळवण्यात येत होता. या ठिकाणी टेबल, खुर्च्या, एअर कूलर व इतर सुविधा जुगार्यांसाठी पुरवण्यात आलेल्या होत्या. या कारवाईत रोख रक्कम, जुगार साहित्य, पाच कार, एक रिक्षा, पंधरा दुचाकी वाहने आणि मोबाइल फोन असा एकूण 60,90,620 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुन्हे शाखेच्या पथकात सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. समाधान हिरे, पोलिस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गुलाब सोनार, शंकर काळे, विलास गांगुर्डे, पोहवा नंदकुमार नांदुर्डीकर, सुनील आहेर, चंद्रकांत गवळी, अतुल पाटील, प्रकाश महाजन, नितीन फुलमाळी, जितेंद्र वजिरे यांचा समावेश होता. इंदिरानगर पोलीस ठाण्यात मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम 4 आणि 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समीर पठाण याचा जुगार मटक्याचा क्लब नेस्तनाबूत
गेल्या आठवड्यात द्वारका परिसरातील काठेगल्ली भागात असलेल्या अनधिकृत सातपीर दर्गा हा पोलिसांच्या कडक बंदोबस्तात मनपाच्या अतिक्रमण विभागाने हटविला. परंतु हा दर्गा हटविण्यापूर्वी समीर पठाण हा सध्या नाशिक कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याने कारागृहातून मुस्लिम धर्मीयांच्या भावना भडकवून दंगल घडवून आणण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. समीर पठाण याच्या विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, इंदिरानगर आणि उपनगर पोलीस ठाण्याच्या सीमारेषेवर असलेल्या समीर पठाण याचा जुगार मटक्याचा क्लब गुन्हे शाखेच्या युनिट 2 च्या पोलिसांनी नेस्तनाबूत केला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.