16 जणांचा मृत्यू; मुंबईची पुन्हा तुंबई
मुंबई :
महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला असून, मुंबई, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत धुवाधार पाऊस सुरू आहे. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. लातूर, नांदेड जिल्ह्यात पावसाने मोठे नुकसान झाले आहे. मनुष्यहानी व जनावरेही दगावल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोसळणार्या मुसळधार पावसाने राज्यभरात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात मराठवाड्यात 11 जणांचा मृत्यू झाला. आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन नांदेड जिल्ह्यात दाखल झाले. कोकण, मराठवाडा, विदर्भात अतिवृष्टी झाली असून, पिकं पाण्याखाली गेली आहेत. मुंबईची पुन्हा एकदा तुंबई झाली असून, मुंबईतील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे. राज्यातील अनेक धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने विसर्गदेखील सुरू झाला आहे.
मुंबईसह उपनगरांत दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, शाळा आणि महाविद्यालयांना आधीच सुट्टी देण्यात आली होती. लोकलसेवा खोळंबल्याने मुंबईतील चाकरमान्यांचे मात्र चांगलेच हाल झाले. मुंबईत ठाण्याकडून सीएसएमटीकडे जाणारी लोकलसेवा काही तास बंद राहिली.
मुंबईच्या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या ट्रांस हार्बर मार्गिकेवर पाणी असल्याने अनेक गाड्या या रेल्वे रुळाकर थांबल्या. त्यामुळे प्रवाशांची मोठी गर्दी आणि गैरसोय झाली होती. मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाने हाहाकार उडाला आहे. दरम्यान, रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून मुंबई-पुणे-मुंबई जाणार्या अनेक रेल्वेगाड्या रद्द
झाल्या आहेत. सतत पडणार्या पावसामुळे ठाणे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. ज्या रस्त्यांवर पाणी साचले आहे, ते रस्ते रहदारी आणि वाहतुकीसाठी प्रशासनाकडून बंद करण्यात आले आहेत. तसेच ठाण्यातील तलावांनी पाण्याची पातळी ओलांडली असून तलावातील पाणी रस्त्यावर आलेले पाहायला मिळत आहे. उपवन तलावाने देखील पाण्याची पातळी ओलांडली असून प्रशासनाने आसपासच्या परिसराला सतर्कतेचा इशारा दिला आहे. या उपवन तलावाकाठी दररोज पावसाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात मात्र पाण्याच प्रमाण जास्त असल्याने.ठाणे महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने नागरिकांना या ठिकाणी येण्यास बंदी घातली असून पर्यायी रस्त्याचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
विदर्भात 50 गावांचा संपर्क तुटला
विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम आणि बुलढाणा या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. गडचिरोली जिल्ह्यासह लगतच्या परिसरात सोमवारी सायंकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासात 12 तालुक्यात 52.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून 15 मंडळात मुसळधार तर 10 मंडळात अतिमुसळधार पावसाची नोंद झाली. या पावसामुळे सद्यस्थितीत 10 जिल्हा मार्ग बंद असून पर्लकोटा नदीच्या पुरामुळे भामरागड-आल्लापल्ली हा राष्ट्रीय महामार्गही बंद झाला आहे. परिणामी तालुक्यातील 50 हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसाने गडचिरोली शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून आपत्ती व्यवस्थापन करणारी नगरपालिकाच पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, हवामान विभागानुसार 20 तारखे पर्यंत विदर्भातील दक्षिणी जिल्ह्यांमध्ये म्हणजेच यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता आहे.
गरजेशिवाय घराबाहेर पडू नये : उपमुख्यमंत्री शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले, की ठाणे जिल्ह्यात हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. बुधवारपर्यंत रेड अलर्ट असल्याने पुढील दोन दिवस आवश्यक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
पुढील 24 तासांत जोर कायम राहणार
उपनगरांत गेल्या 24 तासांत मुसळधार पावसाने कहर केला असून भारतीय हवामान विभागाने अतिवृष्टीची नोंद केली आहे. विक्रोळी परिसरात तब्बल 255.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर भायखळा, सांताक्रुझ, जुहू आणि वांद्रे परिसरातही मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. पुढील 24 तासांमध्येही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सतत दोन दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे ठाणे, कळवा आणि मुंब्रा खाडीत भरतीला सुरुवात झाली आहे.
लोणावळ्यात 150 मिलिमीटर पाऊस
पुणे जिल्ह्यातही सकाळपासून पावसाने हजेरी लावली असून, पर्यटननगरी लोणावळ्यात पावसाने तुफान बॅटिंग केली आहे. अवघ्या दहा तासांत 150 मिलिमीटर पाऊस बरसला. सकाळी 7 ते सायंकाळी 5 दरम्यान पावसाने विक्रमी नोंद केलीये. यंदाच्या मोसमात दहा तासांत पहिल्यांदाच पावसाने अशी बॅटिंग केली. घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी केल्याने अन् तसा पाऊस ही बरसत असल्याने लोणावळ्यातील सर्व शाळांना उद्या आणि परवा सुट्टी जाहीर केलेली आहे.
मुंबईत 300 मिलिमीटर पाऊस ः मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील काही तास मुंबईत पावसाचा जोर कायम राहिल्यास आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत दिले. मिठी नदी धोकादायक पातळीवर गेल्याने आपल्याला 400-500 लोकांना आपल्याला हलवावे लागले. मिठी नदीच्या पातळीवर प्रशासन सातत्याने लक्ष ठेवून आहे. गेल्या काही तासांमध्ये मिठी नदीची पातळी कमी झाली आहे. मात्र, येत्या काही तासांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यादृष्टीने आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आपण सगळ्या गोष्टी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आपण सरकारी आणि खासगी कार्यालयांना सुट्टी आणि वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत. आज संध्याकाळी समुद्राला भरती येणार आहे. तेव्हा पावसाची परिस्थिती काय असेल ते बघावे लागेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.
शासनाच्या बंदीनंतरही सर्वत्र प्लास्टिकच्या फुलांचाच बोलबाला नाशिक ः प्रतिनिधीअवघ्या आठ दिवसांवर आलेल्या गणेश चतुर्थीसाठी बाजारपेठ…
गणेशोत्सवातील राजकीय उत्सव नाशिक : प्रतिनिधी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने इच्छुकांकडून गणेशोत्सवाचा मुहूर्त…
आज जागतिक मच्छर दिन नाशिक : देवयानी सोनार जिल्ह्यात जानेवारी ते जुलै 2025 या सात…
सिन्नर पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचा प्रताप; ठेकेदार आणि अधिकार्यांचे संगनमत सिन्नर : प्रतिनिधी प्रशासकीय राजवटीत…
अपेक्षित दर नसल्याने कांदा उत्पादकांमध्ये नाराजी लासलगाव : वार्ताहर बांगलादेश सरकारने कांद्याच्या आयातीवरील बंदी हटवल्यानंतर…
काही गाड्या रद्द तर काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल, प्रवाशांचे प्रचंड हाल नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी…