स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे मिळून एका शिष्टमंडळाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकार्यांची गुरुवारी भेट घेतली. त्यानंतर दुसर्या दिवशी म्हणजे बुधवारीही भेट घेऊन महाराष्ट्रातल्या मतदार यादीतील घोळ त्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्या कानावर घातला. यावेळी राज ठाकरे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यांवर समर्पक उत्तरे चोकलिंगम यांना देता आली नाहीत. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील मतदार यादीचा घोळ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय पातळीवरून निदर्शनाला आणला होता .कर्नाटकात कशाप्रकारे घोळ झाला याचे तपशीलवार वर्णन त्यांनी दोन पत्रकार परिषदांमध्ये केले होते. त्याचवेळी त्यांनी महाराष्ट्रातही असाच मोठा घोळ झाल्याचा दावा केला होता. आता विधानसभा निवडणुकीसाठी जी मतदार यादी होती. त्याच यादीच्या आधारावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या गेल्या, तर त्या भाजपालाच अनुकूल ठरतील आणि महाविकास आघाडीला ही यादी नुकसानदायक ठरेल, हे लक्षात घेऊन महाविकास आघाडीने मनसेला बरोबर घेऊन एकत्रितपणे यावर आवाज उठवला आहे. यात समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पक्ष अशा सगळ्या छोट्या पक्षांनाही बरोबर घेतले गेले आहे. सर्व पक्षांनी एकत्र येऊन मांडलेल्या कैफियतीवर विचार करणे चोकलिंगम यांना भाग पाडण्यात आले. महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर केवळ पाचच महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी महाराष्ट्रातील मतदार यादीमध्ये लक्षावधी मतदारांची नावे नव्याने जोडली गेली. हे मतदार इतक्या मोठ्या प्रमाणात कसे वाढले? हा मुख्य आक्षेप आहे. सरासरी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 25 ते 30 हजार मतदारांची वाढ झाल्याचे काहींचे म्हणणे आहे. देशाच्या अन्य भागात मतदार यादीमध्ये जसा घोळ झाला तसाच घोळ महाराष्ट्राच्या बाबतीतही झाला आहे, एकाच घराच्या पत्त्यावर असंख्य मतदारांची नावे नोंदवली गेली आहेत. दुबार मतदार नाव नोंदणीचा प्रकारही सर्रास घडला आहे. नाव आणि पत्त्यांचाही घोळ आहे. हे सगळे मुद्दे आज मुख्य निवडणूक अधिकार्यांच्या समोर मांडले गेले आहेत. या अपूर्ण आणि चुकीच्या यादीच्या आधारावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायला विरोधी पक्षांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही बिहारप्रमाणे मतदार याद्यांचे विस्तृत फेरतपासणी करणे गरजेचे बनले आहे. बिहारमध्ये अगदी अल्पावधीत हे फेरतपासणी काम केले गेले. अगदी घाईघाईने निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हेतूने मतदार याद्यांमध्ये घोळ घालण्यासाठीच हा उद्योग केला गेला असा सर्रास आरोप झाला. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी घ्यायच्या आहेत, त्यामुळे अशा प्रकारचा एसआयआर उपक्रम महाराष्ट्रात राबवायला फारच कमी वाव आहे. त्यामुळे या याद्यांची दुरुस्ती हे एक अवघड आव्हान सगळ्यांच्या पुढेच उभे आहे. कमी वेळात फेरतपासणी शक्य होणार नसल्याने आयोगाची मनमानी विरोधकांना सहन करावी लागेल. त्यातून निकाल, जर विरोधात गेले, तर विरोधक स्वस्थ बसणार नाहीत. राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगासमोर जे प्रश्न उपस्थित केले, त्याची तड लागली नाही, तर राज्यात राजकीय अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपाबरोबर नाही, हे स्पष्ट झाले असून, मतदार याद्यांतील घोळाबाबत महाविकास आघाडीबरोबर असल्याचे स्पष्ट झाले आहे. मनसेचा महाविकास आघाडीत समावेश झाला नसल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले नसले, तरी मनसेच्या शिष्टमंडळाने महाविकास आघाडीच्या नेत्यांसमवेत मुख्य निवडणूक अधिकार्यांची भेट घेतली ही बाब लक्षणीय आहे. मनसे महाविकास आघीडीजवळ गेली असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीत नव्या भिडूची गरज नाही, अशी भूमिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतलेली आहे. त्यांनी नव्या भिडूचे नाव घेतलेले नसले, तरी त्यांचा रोख महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांच्याकडे होता. त्यांच्या पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप केलेला आहे. मतदारयाद्यांमध्ये घोळ झालेला असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलेला आहे. राहुल गांधी यांनी उपस्थित केलेले मुद्दे महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना निवडणूक आयोगासमोर कणखरपणे मांडता आलेले नाहीत. महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या पक्षांनाही निवडणूक आयोगासमोर स्पष्ट व आक्रमक भूमिका घेता आली नाही. राज ठाकरे यांनी सपकाळांकडे दुर्लक्ष करुन महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळात जाऊन निवडणूक अधिकारी चोकलिंगम व राज्य निवडणूक आयुक्तांना थेट सवाल केले. राज ठाकरे यांनी अनेक प्रश्न उपस्थित करुन निवडणूक आयोगाला कैचीत पकडण्याचा प्रयत्न केला. हेच काम आधी राहुल गांधी यांनी केलेले आहे. राहुल गांधी यांच्या भूमिकेला राज ठाकरे यांनी आधी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पाठिंबा दिलेला आहे. राहुल गांधी यांच्या भूमिकेला राज ठाकरे यांची भूमिका अनुरुप असतानाही सपकाळ यांना राज ठाकरे किंवा मनसेचे वावडे का आहे, हे काही कळायला मार्ग नाही. महाविकास आघाडीचे बोट धरुन निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करुन राहुल गांधी यांच्या भूमिकेचे समर्थन नुकतेच केले. शिष्टमंडळात राज ठाकरे यांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि प्रश्न उठून दिसणारे आहेत. राज ठाकरे नसते, तर महाविकास आघाडीने भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर करण्याची औपचारिकता पूर्ण केली असती. राज ठाकरे भाजपाच्या विरोधात भूमिका घेत असतील, तर त्यांना वगळून विरोधक कसे पुढे जाणार? हा प्रश्न आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असताना विरोधकांनी निवडणूक आयोगावर तोफ डागली. आहे. निवडणुका निष्पक्ष आणि पारदर्शक व्हाव्यात, या मागणीसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार, शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वोच्च नेते राज ठाकरे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा सहभाग होता. याशिवाय शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आदित्य ठाकरे, अनिल देसाई, अनिल परब, मनसेचे संदीप देशपांडे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश रेड्डी आदींचा शिष्टमंडळात समावेश होता. चोकलिंगम यांच्या भेटीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शशिकांत शिंदे, जयंत पाटील, अनिल देसाई, अनिल परब, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब थोरात, रईस शेख, कॉ. प्रकाश रेड्डी, संदीप देशपांडे, शेकापचे जयंत पाटील यांचा समावेश होता. चोकलिंगम यांना शिष्टमंडळातील नेत्यांनी मतदार याद्यांतील प्रचंड गोंधळ, दुहेरी नोंदी, वयातील विसंगती आणि वगळलेल्या मतदारांविषयीच्या पारदर्शकतेचा अभाव या मुद्द्यांवर निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले. सर्व तक्रारींचा एकत्रित अहवाल देऊन, या त्रुटी तातडीने दूर करण्याची मागणी केली. महाविकास आघाडीत नव्या भिडूची गरज नाही, अशी भूमिका घेणारे काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा शिष्टमंडळात समावेश नव्हता. निवडणूक अधिकार्यांसमोर उपस्थित करण्यात आलेले मुद्दे राज ठाकरे यांनीच प्रभावीपणे मांडले. येथे काँग्रेसला महाविकास आघाडीत नवा भिडू गरजेचा वाटला नाही. राहुल गांधी यांच्या भूमिकेचे राज ठाकरे यांनी यापूर्वी अनेकदा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे जोरदार समर्थन केलेले आहे. असे असताना सपकाळांना नवा भिडू म्हणून मनसे किंवा राज ठाकरे यांचे वावडे का आणि कशासाठी, हे काही कळायला मार्ग नाही.