डॉ. संजय धुर्जड.*
सुदर्शन हॉस्पिटल, नाशिक.
9822457732
६ जून, नेहमीच माझ्या स्मरणात राहणारा, असा हा दिवस. याचे अनेक कारणं आहेत. सर्वप्रथम, याच दिवशी माझा वाढदिवस असतो (रेकॉर्ड नुसार). दुसरे, ६ जून २००६ या दिवशी सुदर्शन हॉस्पिटलची मुहूर्तमेढ रोवली गेली असल्याने दर वर्षी ६ जूनला माझा वाढदिवस आणि हॉस्पिटलचा वर्धापन दिवस असा दुग्धशर्करा योग गेल्या १७ वर्षांपासून माझ्या जीवनात मी साजरा करतो आहे.
या दिवशी माझ्या जीवनातील जवळचे आणि जिवाभावाच्या लोकांसोबत वेळ घालवून आत्तापर्यंत मला मिळालेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असतो. याच दिवशी आणखी एक दुर्मिळ योगायोग जुळून येत असतो. ६ जून १६७४ या दिवशी महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदू धर्मरक्षक, स्वराज्य संस्थापक, आदर्शवत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता.
हा योग दर वर्षी हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडावर मोठ्या दिमाखात साजरा होत असतो. इच्छा असूनदेखील मला हा सोहळा अनुभवता आलेला नाही. या वर्षी जाण्याचे ठरवले होते की आता काहीही झालं तरी, रायगडावर हजेरी लावून राजांना मुजरा करायचा.
परंतु, बातम्यांमध्ये बघितलं की, शुक्रवारी २ जून ला रायगडावर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला आहे.
योग असा की, गल्या आठवड्यात माझ्या एका स्नेही व हितचिंतकांनी मला गुरुवारी १ जूनला एका दत्त मंदिरातील संध्यारतीला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले होते. माझ्या हस्ते तेथील दत्त गुरूंची आरती करण्याची विनंती केली असता, मी त्यांची विनंती लगेचच मान्य केली.
धार्मिक, अध्यात्मिक आणि सात्विक वातावरणात रमायची नेहमीच आवड असल्याने मी त्यांचे आमंत्रण स्वीकारले. ठरल्याप्रमाणे, मी माझे सर्व कामे आटोपून त्या दिवशी त्या ठिकाणी पोहोचलो. नाही म्हंटलं तरी, मला थोडा उशीर झालाच. उशीर झाला असला तरी माझ्यासाठी सर्व मंडळी थांबली होती.
परिसरातील सर्वच ज्येष्ठ, श्रेष्ठ, महिला, पुरुष आणि तरुण मंडळी तिथे उपस्थित होती. आरती झाली, पूजा केली, दर्शन घेतले. छोटीशी सभाही घेण्यात आली. तेव्हा कळले की दुसऱ्या दिवशी, म्हणजे २ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा शिवराज्याभिषेक दिन आहे.
त्यानिमित्त, राज्याभिषेक प्रतिमेचे पूजन करून राजांना अभिवादन केले. खूप छान वाटलं. जणू राज्याभिषेक होतोय, आणि मी त्याचा साक्षीदार म्हणून अनुभव घेतोय असं चित्र नजरेसमोर बघायला मिळालं. त्यानंतर, मला राजांबद्दल माझे विचार मांडण्याची विनंती केली असल्याने पुढील १० – १५ मिनिटांत मी माझे मनोगत व महाराजांचे माझ्यावर असलेल्या प्रभावाबद्दल माझे विचार मांडले. नंतर, माझा यथोचित सत्कार करून मी तेथील उपस्थितांचा निरोप घेतला.
तिथून निघाल्यापासून ते आत्ता हा लेख लिहीत असल्यापर्यंत एकच विचार आणि प्रश्न माझ्या मनात रेंगाळत आहे. दर वर्षी तर ६ जून ला राज्याभिषेक दिन साजरा होत होता. मग आत्ता या वर्षी २ जून तारीख अचानक कुठून आली. कळले की इंग्रजी कॅलेंडर नुसार ६ जून १६७४ हा दिवस असल्याने त्यानुसार हा दिन पाळला जात होता.
२ जून २०२३ रोजी ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी असल्याने तिथीनुसार याच मुहूर्तावर राजांचा राज्याभिषेक झालेला असल्याने यावर्षी ३५० वा राज्याभिषेक दिन साजरा केला जाणार आहे, असे समजले. हाच प्रकार गेल्या काही वर्षांपूर्वी, राजांच्या जयंती बाबत चालू होता. माझ्या लहानपणी, महाराजांची जयंती ही तिथीनुसार साजरी व्हायची. मधील काळात काही मंडळींनी १९ फेब्रुवारी १६३० ही शिवजन्माची तारीख शोधून काढली, आणि म्हणे की आता आम्ही शिवजयंती १९ फेब्रुवारी ला साजरी करू. शासकीय पातळीवर ती जाहीर झाली आणि तशी सरकारी सुट्टीदेखील जाहीर झाली.
दुसरा गट अजूनही तिथीवर अडून बसलेला होता. म्हणून काही वर्षे दोन शिवजयंत्या साजऱ्या व्हायच्या. कशासाठी ते कळले नाही, परंतु हळू हळू आता १९ फेब्रुवारी जास्त प्रचलित होत गेली आणि तिथीनुसारची जयंती मागे पडून आता ती जवळपास बंदच झाली आहे. हल्ली “जगात भारी, १९ फेब्रुवारी” अशी उद्घोषणा मुखोमुखी ऐकायला मिळते.
आता, राज्याभिषेकाचेही असेच काहीतरी होतांना दिसते आहे. तारीख की तिथी ? असा नवीन वाद / चर्चा पुढील काही वर्षांत झाल्यास आश्चर्य वाटू देऊ नका. कारण, सगळेच लोक (पक्ष) महाराजांच्या नावाचा वापर करून आपला वयक्तिक (राजकीय) फायदा उचलण्याच्या विचारात असतात.
मग मुद्दा जयंतीचा असो, की राज्याभिषेकाचा असो, की स्मारकाचा असो, की गडकिल्ल्यांचा, की राजमुद्रेचा असो, की खऱ्या खोट्या इतिहासाचा. काहीतरी मुद्दा उपस्थित करून महाराजांच्या नावाने जनतेच्या (मराठ्यांचा) भावनांना साद घालून राजकीय लाभ उचलायचा, अशी प्रथा बनू पाहत आहे.
महाराष्ट्रात मराठा समाज संख्याने सर्वांत मोठा समुदाय आहे. त्याला आपल्याकडे आकर्षित करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांकडून होत असतो. म्हणून कदाचित महाराजांच्या बाबत असे होत असावे. आता शिवाजी महाराजांच्या मागोमाग संभाजी महाराजांच्या बाबतीतही अनेक वादातीत मुद्दे वेळोवेळी येत होते, आहे आणि पुढेही येतील.
यापूर्वी, महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यावरून कधीही वेगळे मत मांडले गेले नाही, मग आत्ताच का ही उठाठेव, असा प्रश्न पडणे साहजिक आहे. मलाही तोच प्रश्न पडला आहे. सद्यपरिस्थितीतील राजकीय तोडफोड, आणि जुळवाजुळव बघितली तर, येऊ घातलेल्या मध्यवर्ती आणि राज्यपातळीवरील निवडणुकांवर लक्ष केंद्रित महाराजांचे आम्हीच खरे समर्थक, अनुयायी, वारसदार आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न तर होत नसेल ना ?
असे काही दाखवण्याची धडपड करण्यापेक्षा महाराजांच्या जीवनातून काहीतरी बोध घेऊन, राज्यकर्त्यांनी महाराजांप्रमाणे राज्य करावे. महाराजांची रणनीती, त्यांचे नियोजन, धोरण, जनतेविषयी तसेच दुश्मनाविषयी असलेला आदरभाव व सहिष्णुता जाणून घेण्यासाठी जगभरातून अभ्यास करण्यासाठी लोक उत्सुक असतात.
त्यांचे मॅनेजमेंट (व्यवस्थान) आणि एक्झिक्युशन (अंमलबजावणी) मधील सटीकतेचा अभ्यास करून जनतेसाठी राजकारण आणि समाजकारण केले तर मराठेच काय, परंतु महाराष्ट्रातील सर्वच समाजातील लोक अशा राजकीय पक्षाला मतदान करून कायम सत्तेत बसवतील, यात तिळमात्र शंका नाही.
सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून असे वाटते की येणाऱ्या काळात असे काही होणे दुर्मिळच वाटते. येन केन प्रकारे सत्ता काबीज करणे, हाच उद्देश प्रत्येकाचा असतो. विशेष करून, मागील साडेतीन चार वर्षांपासून तरी असेच होतांना दिसतेय.
असे, फक्त महाराष्ट्रातच नव्हे, ते देशाच्या अनेक राज्यांमध्ये होत असल्याचे चैत्र बघायला मिळते आहे. राजकीय पक्ष, पक्षांचे धोरण, विचारधारा, जाहीरनामे, वचननामे, असा काही प्रकार उरलेलाच नाही. दुसऱ्याची कोंडी करून, उचित संधी शोधून सत्ता काबीज करायची, हे सर्रास सुरू आहे.
वास्तविक, इतिहास उलगडून बघितला तर, सत्ता काबीज करण्याची ही पद्धत भारतीयांची कधीच नव्हती. परकीय राज्यकर्त्यांचीच ही नीती होती. सत्ता टिकवण्यासाठी, सत्ता हस्तगत करण्यासाठी, किव्हा सत्ता हिसकावून घेण्यासाठी कुठल्याही थराला उतरणे हे खिलजी, मुघल, निझाम, शहा, इंग्रज, पोर्तुगीज यांची परंपरा होती.
भारतातील मौर्य, गुप्त, चोळ, राजपूत, मराठे, पेशवे, शिखांनी जीवाची बाजी लावून, आपल्या मनगटातील ताकदीवर राज्य निर्माण केले, ते राखले, टिकवले आणि वाढवले. कधीही छल, कपट, धोकाधडी, दडपशाही, लाचखोरी केली नाही.
सतरा वेळा एखाद्या शत्रूला मात देऊन त्याला मोठ्या दिलाने माफ करून जीवनदान देणाऱ्या महान राजा पृथ्वीराज चौहनांची ही भूमी, अफजल खानाचा वध करून त्याच्या मुलांचा दोष नाही म्हणून मुलांची सुटका करून जीवनदान देणाऱ्या महान राजांची ही भूमी आहे.
मग आत्ताचे राजकारणी ही नीती कुठून शिकून आले आहेत, हे समजत नाही. ३५० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने छत्रपती झाले. हिंदू पातशहा उदयास आला. देवगिरीच्या राजारामदेव राय आणि शंकरदेव राय या यादव कुळातील शेवटच्या हिंदू राजांनंतर ३५० वर्षांनी एक हिंदू राजाने स्वतःला स्थापित केले होते. त्या घडीला आज आणखी ३५० वर्षे झाली आहे. मधल्या काळातील खिलजी, सुलतान, मुघल यांची नितीच आज भारतात रुजू होऊ पाहत आहे, ही बाब चिंताजनक वाटते.
आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त तारीख आणि तिथीचे राजकारण करण्यापेक्षा महाराजांच्या आदर्शवत जीवनातून बोध घेऊन आपले जीवन जगायचे ठरवले, तर जनता आणि राज्यकर्ते दोघे मिळून रामराज्य स्थापन करण्यात यशस्वी होतील, असे तुम्हालाही वाटते ना ?.
*
ReplyForward
|
Jai Bhavani