देवळा तालुक्यातील पूर्व भागाचा सिंचनप्रश्न मार्गी लागणार
देवळा : प्रतिनिधी
तालुक्याच्या पूर्व भागाचा शेती सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा, यासाठी चणकापूर उजव्या कालव्यांंतर्गत रामेश्वर धरण ते चिंचवे या 26 किलोमीटरपर्यंतच्या रुंदीकरण व अस्तरीकरण करून कालव्याची वहनक्षमता वाढविण्याच्या कामासाठी 65 कोटींचा निधी मंजूर होऊन या कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. यामुळे सुमारे 16 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे, अशी माहिती आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना आमदार डॉ. आहेर यांनी सांगितले की, हे महत्त्वाकांक्षी काम पुढील एक वर्षात पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. या कालव्यासाठी एकूण 18 विमोचक ( गेट) बसविण्यात येणार असल्याने छोटे-मोठे पाझर तलाव भरून त्याचा लाभ शेतीला होणार आहे. रामेश्वर ते झाडी या चणकापूर उजवा वाढीव कालव्याची सध्याची वहनक्षमता 87 क्यूसेक इतकीच आहे, मात्र या नव्याने प्रस्तावित कामामुळे ती 265 क्यूसेक इतकी होणार आहे. तर झाडी येथील वहनक्षमता जी 13.80 क्यूसेक आहे, ती आता 108 क्यूसेक इतकी होणार आहे.
याअगोदर या वाढीव कालव्याला फक्त पूरपाण्याचीच मान्यता होती, परंतु आता नार-पार योजनेमध्ये समाविष्ट केल्यामुळे सदर कालवा हा आठमाही होऊन शेतीसिंचनासाठी त्याचा उपयोग होणार आहे. यामुळे 11 हजार 500 हेक्टर क्षेत्र शाश्वत सिंचनाखाली येईल. शेतीपाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याच्या योजनांनाही त्याचा लाभ होणार असल्याने हे काम दुष्काळी भागासाठी वरदान ठरणार आहे.
यानंतरच्या दुसर्या टप्प्यात चणकापूर ते रामेश्वर या उजव्या कालव्याच्या 38 किलोमीटरच्या विस्तारीकरणासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून याचीही वहनक्षमता वाढवली जाणार आहे. यामुळे या कालव्याची वहनक्षमता 184 क्यूसेकवरून ती वाढवून आता 427 क्यूसेक करणे प्रस्तावित आहे. तर रामेश्वर धरण येथे टेलला पूर्वीची 88 क्यूसेक असलेली वहनक्षमता 260 होणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रशांत देवरे उपस्थित होते.
या गावांना होणार लाभ
नव्याने तीन हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊन यातून वाजगाव, भावडे, रामेश्वर, वडाळे, सुभाषनगर, कापशी, भिलवाड, गुंजाळनगर, वाखारी, दहिवड आदी गावांना त्याचा लाभ होणार आहे. याशिवाय, चिंचवे ते झाडी या पुढील साखळी क्र. 27 ते 36 या कामाचे सर्वेक्षण सुरू आहे. तसेच चणकापूर कालव्याच्या दक्षिण भागाकडील उंचीवर असलेल्या व मूळ अस्तित्वातील कालव्याच्या पाण्यापासून वंचित राहत असलेल्या गावांसाठी रामेश्वर धरण व शेरी येथील उपसा जलसिंचन योजनेचेही काम प्रस्तावित आहे.