पुरातन मंदिरांची डागडुजी सुरू, ठिकठिकाणी बॅरिकेड्स उभारून रहदारी बंद
नाशिक : मुकुंद बाविस्कर
महापालिकेकडून सिंहस्थापूर्वी रामकाल पथ साकारला जाणार आहे. पुरातन मंदिरांची डागडुजी सुरू झाली असून, मंदिरांच्या सभोवती बांबूचे जाळे व निळे बारदाणे लावले आहे. या कामासाठी ठिकठिकाणी बॅरिकेड्स उभारून रहदारी बंद करण्यात आली आहे. रामकाल पथ योजनेत रामकुंड आणि श्री काळाराम मंदिर परिसरातील पुरातन मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. मंदिरांसह परिसरातील इमारतींची दुरुस्ती, नूतनीकरण आणि जीर्णोद्धारासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील कामास सुरुवात झाली आहे. या मार्गाचे दगडी बांधकाम व सौंदर्यीकरण, इतिहासफलक उभारणे, रामकथेशी संबंधित डिजिटल माहिती फलक उभारणे, प्रकाशयोजना, भाविकांसाठी दिशादर्शक फलक अशी कामे यात समाविष्ट करण्यात आली आहेत.
विशेष म्हणजे, रामकाल पथ प्रकल्पात गोदावरीच्या काठावरील पुरातन मंदिरे आणि इमारतींच्या दर्शनी भागातील दुरुस्ती, नूतनीकरण,
जीर्णोद्धाराचे काम करण्यात येणार आहे. केंद्राने मंजूर केलेल्या प्रकल्पानुसार पहिल्या टप्प्यात रामकुंड आणि काळाराम मंदिर परिसरातील पुरातन मंदिरे, इमारतींची दुरुस्ती, नूतनीकरण, जीर्णोद्धार करण्याच्या कामात मुख्यत्वे दगडकाम, लाकडी काम, दगडी फरशी, वीट बांधकाम, प्लास्टर आदींचा समावेश होता. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने धार्मिक पर्यटन वाढीला लागावे म्हणून गोदाघाट परिसरात रामकाल पथ उभारण्यास 99.14 कोटी रुपये मंजूर केले. पहिल्या टप्प्यात 65 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. राज्य सरकारने 47 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. असा एकूण 146 कोटी रुपये रामकाल पथ खर्चासाठी येणार आहे. सुमारे 18 कोटी रुपये खर्च करून अहिल्यादेवी होळकर पूल ते टाळकुटेश्वर पुलादरम्यान सुशोभीकरण, सीतागुंफा ते श्री काळाराम मंदिर व रामतीर्थपर्यंतचा भाग रामकाल पथ योजनेंतर्गत विकसित केला जाणार आहे. त्यापूर्वी महापालिकेमार्फत जागा उपलब्ध करून देणे, कागदपत्रांची पूर्तता करण्याची तांत्रिक कामे पूर्ण केली जात आहेत. या भागात रामकाल पथ उभारणी करताना मालेगाव स्टॅण्ड ते सरदार चौक, संत गाडगे महाराज पूल तसेच श्री काळाराम मंदिर यादरम्यानची इमारतींच्या जवळून जाणार्या तीन ते चार किलोमीटरच्या हाय टेन्शन वीजतारा भूमिगत केल्या
जाणार आहेत.
वाल्मीकी रामायणामध्ये संदर्भ असलेला पंचवटी, गोदाकाठ परिसरातील रामकाल पथ हा पौराणिक काळातील एक महत्त्वाचा दुवा आहे. परंतु तो काशी, वाराणसीच्या धर्तीवर असेल, तर कुंभमेळ्यासाठी येणार्या पर्यटकांसाठी केवळ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. त्यातील धार्मिकता आणि पवित्रता जपण्याची गरज पंचवटी परिसरातील साधू-संतांनी व्यक्त केली आहे. पौराणिक रामकाल पथ कुंभमेळ्यामुळे चर्चेत आला असून, वनवास श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मण यांच्या गमनाशी संबंधित मानला जाणारा धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याने संवर्धन, सुशोभीकरण आणि पर्यटनविकास यासाठी सध्या प्रशासन काम करत आहे. संशोधकांच्या सांगण्यानुसार प्राचीन ग्रंथ, कागदपत्रे आणि संतपरंपरेतील उल्लेखांमध्येही रामवाटा, रामकालाचा मार्ग अशी नावे आढळतात.
धार्मिक पर्यटनात भर
रामकाल पथाला नवे रुपडे आल्यास पंचवटीला भेट देणार्या देश-विदेशातील पर्यटकांची संख्या वाढेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. रामतीर्थ-काळाराम मंदिर- संगमेश्वर हा पौराणिक त्रिकोण अधिक आकर्षक होणार असून, धार्मिक पर्यटन अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, रामकाल पथ प्रकल्पांतर्गत सीतागुंफा ते काळाराम मंदिर, सरदार चौक ते रामकुंड रस्ता आणि रामकुंड परिसर सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये सीतागुंफा रस्ता रुंदीकरण, काळाराम मंदिर चौक ते उद्यान सुशोभीकरण, काळाराम मंदिर ते रामकुंड रस्ता आणि रामकुंड परिसर रुंदीकरण व सुशोभीकरणाचा अंतर्भाव आहे. रामकुंड व काळाराम मंदिर परिसरात अनेक पुरातन मंदिरे आहेत. त्यांचा जीर्णोद्धार या माध्यमातून होणार आहे.
रामकाल पथाला आध्यात्मिक परंपरा आहे. पुराणकाळातील जनस्थानी (नाशिकला) वास्तव्यात असताना, तसेच वनवास काळामध्ये याच पथावरून प्रभू रामचंद्र गेले. याचे अनेक पुरावे शास्त्रांमध्ये सापडतात. वाल्मीकी रामायणात आलेल्या उल्लेखाप्रमाणे रामकाल पथ झाल्यास ते संयुक्तिक ठरणार आहे. काशी, वाराणसीच्या धर्तीवर केवळ पर्यटकांसाठी आकर्षण म्हणून न राहता त्याचे आध्यात्मिक महत्त्व जपले गेले पाहिजे.
– देवेंद्रनाथ पंड्या, इतिहास संशोधक