सिंधुदुर्ग जि. प.वर भाजपची एकहाती सत्ता
सिंधुदुर्ग : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जिल्हा परिषदेत तब्बल 27 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले असून, तळकोकणात ‘राणे ब्रँड’ची हवा पुन्हा एकदा कायम असल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.
सोमवारी (दि.9) एकीकडे आंगणेवाडीतील श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात सुरू असतानाच, दुसरीकडे जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारा निवडणूक निकाल जाहीर झाला. या दुर्मीळ योगायोगामुळे राणेंना भराडी देवी पावली अशी भावना कार्यकर्त्यांत व्यक्त होत आहे. 50 सदस्यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपने 27 जागा जिंकत स्पष्ट बहुमताचा टप्पा ओलांडला आहे. 100 जागांच्या पंचायत समिती निवडणुकीत भाजपने 60 जागा जिंकत वर्चस्व प्रस्थापित केले आहे. शिंदे गटाची शिवसेना 27 जागांसह दुसर्या क्रमांकावर आहे, तर ठाकरे गट केवळ 7 जागांवर समाधान मानताना दिसतो. विशेष म्हणजे, वैभववाडी पंचायत समितीत भाजपने सर्वच्या सर्व 6 जागा जिंकत ‘क्लीन स्वीप’ केला आहे.