पिंपळणारेतील बलात्कार पीडित युवतीची आत्महत्या
पोलिसांच्या हातावर तुरी दिलेला आरोपी फरारच
दिंडोरी: प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यातील पिंपळणारे येथील एका विवाहीत युवकाने लग्नाचे अमिष दाखवित एका युवतीवर वारंवार बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली असता चौकशीच्या दरम्यान पोलिसांच्या हातावर तुरी देवून पसार झाला असून या प्रकरणातील पीडीत युवतीने त्यांच्याच शेतातील विहीरीत आत्महत्या केल्याची घटना घडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिंडोरी तालुक्यातील पिंपळणारे येथील युवती बरोबर गावातीलच ग्रामपंचायत सदस्य व विवाहित उमेश बंडू खांदवे (35) या युवकाने एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2023 पर्यंत गुरुसाई लॉज दिंडोरी, ग्रीनव्हॅली लॉज वलखेड फाटा तसेच साईतीर्थ लॉज अंजनेरी (त्र्यंबकेश्वर) अशा वेगवेगळ्या ठिकाणी घेवून जाऊन लग्नाचे अमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याची फिर्याद पीडित युवतीने दि. 27 सप्टेंबर रोजी दाखल केली होती. फिर्यादीवरुन दिंडोरी पोलिसांनी आरोपी उमेश खांदवे यास अटक केली होती. त्यास न्यायालयात हजर केले असता त्याला 30 सप्टेंबर पर्यंत न्यालयाने पोलिस कोठडी सुनावली होती. यावेळी दि. 28 सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वर येथील लॉज येथे आरोपीला दिंडोरीचे पोलिस उपनिरीक्षक पांडूरंग कावळे, पो. ना. सुदाम धुमाळ हे चौकशीसाठी घेवून गेले होते. चौकशी पुर्ण होवून परत येत असतांना गंगापूर रोड येथील विसे मळा येथे आरोपीने लघुशंकेचा बहाणा करुन गाडी थांबवण्यास सांगितले. यावेळी रस्त्याच्या कडेला लघुशंकेचा बहाणा करत पोलिसांच्या हाताला झटका मारुन व अंधाराचा फायदा घेत आरोपीने पोबारा केला. त्यानंतर जवळच एका विहीरीजवळ आत्महत्येचा बनाव देखील केला होता. परंतू पोलिस चौकशीत तो बनाव असल्याचे सिध्द झाले होते. ही घटना ताजी असतानाच दि. 30 सप्टेंबर रोजी रात्री साडे आठ वाजता युवती
ही घरात झोपली होती. सकाळी चार वाजेच्या सुमारास आईला जाग आली असता मुलगी घरात नसल्याचे लक्षात आले. त्यावरुन दिंडोरी पोलिस ठाण्यामध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर घरी गेल्यानंतर त्यांच्याच शेतातील विहीरीत युवतीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करुन मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दुधेडीया यांच्याशी संपर्क साधला असता प्रथम दर्शनी पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याचे निदर्शनास येत असून शवविच्छेदनाचे अहवालात आत्महत्या की हत्या यासंदर्भात माहीती मिळेल, अशी प्रतिक्रिया दिली. पुढील तपास दिंडोरी पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलिस करीत आहे. दरम्यान या घटनेतील फरार आरोपीला पकडण्याचे मोठे आव्हान दिंडोरी पोलिसांपुढे उभे ठाकले असून हे प्रकरण पोलिसांची डोकेदुखी वाढवणार असल्याची चर्चा आहे.