मुंबई: रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील लढतीचे चित्र अखेर स्पष्ट झाले असून, ही जागाही भाजपने शिंदे गटाकडून पदरात पाडून घेतली आहे, मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी माघार घेतल्याची घोषणा उदय सामंत यांनी केल्यानंतर भाजपने नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता या मतदार संघात पुन्हा राणे विरुद्ध विनायक राऊत असा सामना रंगणार आहे, 2019 ला झालेल्या निवडणुकीत विनायक राऊत यांनी नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांचा तब्बल पावणे दोन लाख मतांनी पराभव केला होता. यावेळी विनायक राऊत यांच्या विरोधात स्वतः नारायण राणे मैदानात उतरले असल्याने ही लढत मोठी रंगतदार होणार आहे. राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने शिंदे गटाची आणखी एक जागा वाटाघाटीत कमी झाली आहे, आता नाशिक ची जागा कुणाला मिळते? याकडे लक्ष लागून आहे.