व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी वृत्तपत्रांचे नियमित वाचन करा : डॉ. बैरागी

नाशिकरोडला वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाल्यांचा गुणगौरव

नाशिक : प्रतिनिधी
पालकांच्या कष्टांची सदैव जाणीव ठेवा. मोठे ध्येय ठेवले तरच उत्तुंग यश मिळते. यशस्वी व्यक्तिमत्व घडण्यासाठी वृत्तपत्रांचे नियमित वाचन करा. मोबाईल व नकारात्मक गोष्टींपासून दूर रहा. निरोगी आयुष्यासाठी फास्ट फूड टाळा. नियमित व्यायाम आणि योग्य लाईफ स्टाईलमुळे आजारांना लांब ठेवता येते. घरचे सकस अन्न घेतल्याने बुध्दी तल्लख होते. केवळ इंजिनियर, डॉक्टर न होता आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करून पालकांचा, देशाचा नावलौकिक वाढवा, असे प्रतिपादन मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख डॉ. चैतन्य बैरागी यांनी केले.
नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेतर्फे वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा कुलथे मंगल कार्यालयात झाला. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या वेळी 80 पाल्यांचा सत्कार करण्यात आला. नाशिक रोड वृत्तपत्र विक्रेता संस्थेचे अध्यक्ष सुनील मगर, दैनिक सकाळचे वितरण व्यवस्थापक बळीराम पवार, दैनिक लोकमतचे प्रमोद मुसळे, दैनिक दिव्य मराठीचे निलेश कुंभकर्ण, दैनिक पुढारीचे शरद धनवटे, दैनिक पुण्यनगरीचे कैलास बडगुजर, दैनिक सामनाचे आर. आर. पाटील, दैनिक लोकसत्ताचे प्रसाद क्षत्रिय, दैनिक तरुण भारतचे सचिन आडके, सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष दत्ता ठाकरे, राजेंद्र ट्रान्सपोर्टचे नाना कानडे प्रमुख पाहुणे होते. दैनिक लोकमतचे निवासी संपादक अभिजित कुलकर्णी यांनी यावेळी सदिच्छा भेट दिली.
प्रारंभी दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष सुनील मगर यांनी प्रास्ताविक केले. वृत्तपत्र विक्रेते प्रताप गांगुर्डे यांची कन्या संजना डॉक्टर तर राजेंद्र थोरमिसे यांची कन्या सुप्रिया वकील झाली. विजय विसपुते यांची कन्या वृष्टीला दहावीत 95 टक्के मिळाले. त्यांच्यासह 80 गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी लकी ड्रॉ काढून बक्षीस वितरण करण्यात आले. त्यामध्ये उल्हास कुलथे यांच्या मातोश्री लिलाबाई यांच्या स्मरणार्थ दिपाली सोनार यांना चांदीचा गणपती व ज्योती थोरमिसे यांना चांदीचा करंडा देण्यात आला. कल्पना परसे, पूजा हसे, माया पोटे, मंगल सोनवणे, मनीषा निरभवणे यांना पैठणी मिळाली. अन्य वस्तूंचे वाटपही झाले. कार्यक्रमाचे संयोजन संस्थेचे उपाध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, रवि भोसले, खजिनदार योगेश भट, सचिव गौतम सोनवणे, कार्याध्यक्ष उल्हास कुलथे, महाराष्ट्र राज्य संघटनेचे विभागीय सचिव महेश कुलथे, ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते विजय सोनार, किशोर सोनवणे, भारत माळवे, इस्माईल पठाण, विकास राहाडे, अनिल कुलथे, वसंत घोडे, हर्षल ठोसर, रवी सोनवणे आदींनी केले. महेश कुलथे यांनी सूत्रसंचालन केले. गौतम सोनवणे यांनी आभार मानले. वृत्तपत्र विक्रेते आणि त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *