तिसर्या श्रावणी सोमवारी कपालेश्वराच्या दर्शनासाठी झालेली शिवभक्तांंची प्रचंड गर्दी. दुसर्या छायाचित्रात तिसर्या श्रावणी सोमवारी सोमेश्वर येथे दर्शनासाठी झालेली गर्दी. तिसर्या छायाचित्रात त्र्यंबकेश्वर येथे श्रावण महिन्याच्या तिसर्या सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी शिवभक्तांंची उसळलेली अभूतपूर्व गर्दी. (छाया : रविकांत ताम्हणकर)
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर येथे श्रावण महिन्याच्या तिसर्या सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी शिवभक्तांची अभूतपूर्व गर्दी उसळलेली पहावयास मिळाली. रविवारी दुपारपासून ते सोमवारी दुपारपर्यंत भक्तांचा ओघ अखंड सुरू होता. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्गावर भाविकांची 24 तासांपेक्षा अधिक वेळ गर्दी झालेली यावेळी अनुभवास आली. त्र्यंबकेश्वर शहरात प्रदक्षिणेला जाणार्या भक्तांचा ‘हर हर महादेव’ आणि ‘बम बम भोले’चा जयघोष अहोरात्र घुमत होता. ब्रह्मगिरी आणि गंगाद्वार येथेदेखील भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी सकाळच्या वेळेस विशेष गर्दी दिसून आली नाही. मात्र, दुपारनंतर काही दर्शनबारीतील भक्तांची उपस्थिती वाढलेली दिसली. रविवारी सायंकाळनंतर कुशावर्तावर गर्दीत वाढ झाली, ती सोमवारी दुपारपर्यंत कायम होती.
सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्र्यंबकराजाची पालखी कुशावर्तावर आली तेव्हा भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास त्र्यंबकेश्वर मंदिरात पालखी परत आली तेव्हा नित्य प्रदोष पुष्प पूजक डॉ. ओमकार आराधी यांनी आकर्षक शृगांर पूजा केली व भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी गर्भगृहात प्रदोष पूजक डॉ. ओमकार आराधी, सदाशिव आराधी, पुजारी आदित्य तुंगार आदी उपस्थित होते.
सोमवारी सकाळी त्र्यंबकेश्वर मंदिरात देवस्थान ट्रस्टच्या वतीने विश्व कल्याणार्थ विश्वस्तांनी लघुरूद्र पूजा केली. यावेळी सर्व विश्वस्त सपत्नीक पूजेला बसले होते. यामध्ये देवस्थान ट्रस्टचे चेअरमन जिल्हा व सत्र न्यायाधीश न्या. सचिन भन्साली यांनी सपत्नीक पूजेत सहभाग घेतला. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्गावर व त्र्यंबकेश्वर शहरात ठिकठिकाणी उपवासाचे पदार्थ, फळे आणि खिचडी वाटप सुरू होते.