नादुरुस्त बसेसचा प्रश्न ऐरणीवर
नाशिक ः प्रतिनिधी
सिन्नर बसस्थानकात नऊ वर्षांच्या मुलाचा अपघात झाला. गेल्या काही महिन्यांपूर्वी महामार्ग स्थानकावर बसने एका महिलेचा बळी घेतला होता. चालकाचे अनावधान, तांत्रिक अडचणी, बसचे ब्रेक फेल झाल्याचे बसस्थानक प्रशासनाकडून सांगण्यात येते. अशा घटनांमुळे लालपरीचे ब्रीदवाक्य प्रवाशांच्या सेवेसाठी की, लोकांचा जीव घेण्यासाठी, असेच आता म्हणावे लागेल.
राज्य परिवहन महामंडळात अनेक बस स्क्रॅपमध्ये काढलेल्या असूनही तशाच प्रवाशांच्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर धावत आहेत. याचा अनुभव अनेकांनी दिवाळीच्या सुट्यांमध्ये घेतला आहे. अनेकदा इच्छित स्थळी जाण्यासाठी निघूनही ब्रेक फेल होणे, पंक्चर होणे, अचानक तांत्रिक अडचणी येणे आदी प्रकारांनी प्रवाशांचे हाल होत आहेत. चालक, वाहकांनीही अनेकदा बसेस नादुरुस्त असल्याचे सांगूनही तशाच दामटवल्या जात असल्याचे सांगितले. त्यामुळे प्रवाशांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
एसटी महामंडळात ई-शिवाई, शिवनेरी, शिवशाही आदी वातानुकूलित बससेवा सुरू करण्यात आल्या असल्या, तरी शिवशाहीसह इतर बसेसच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या या वातानुकूलित बससेवेतील अनेक बस सध्या अकार्यक्षम अवस्थेत असल्याचे चित्र आहे. प्रवासादरम्यान सोयीसुविधा मिळण्यासाठी जादा बसभाडे देऊनही अनेकदा मनस्तापाला सामोरे जावे लागते. वातानुकूलित सुविधा, मळके पडदे, दुर्गंधी, कचरा, तुटलेली आसने, प्रवाशांना महत्त्वाचे असलेले मोबाइल चार्जर सुविधा कनेक्ट होत नाही. परिणामी, मनस्तापाला सामोरे जावे लागते. एसटीच्या वातानुकूलित सेवेसाठी जादा पैसे भरूनही सुविधा बंद पडलेल्या आहेत. वातानुकूलित सेवा बंद असलेल्या बसेसची दुरुस्ती आगारातच केली जात असून, त्यानंतर त्या मार्गावर पुन्हा पाठविण्यात येतात. बसेसच्या खिडक्यांच्या काचा पूर्ण असल्याचा दावा केला जात आहे. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे.
प्रवाशांच्या तक्रारीनुसार अनेक शिवशाही बसेसमधील चार्जिंग पॉइंट्स बंदावस्थेत आहेत. नाशिक आगारापुरती ही समस्या मर्यादित नसून, अनेक आगारांत शिवशाहीसह इतर बसेसची स्थिती अशीच असल्याचे दिसत आहे. सुट्यांचा हंगाम पर्यटन, गावी, कामानिमित्त प्रवास केला जातो. त्यासाठी आरामदायी शिवशाहीसह इतर बसेसला प्राधान्य दिले जाते. पण अनेक सोयीसुविधांअभावी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. चालकांना पुरेसे प्रशिक्षण न देता बस हातात दिली जाते. कधी बसेस नादुरुस्त असल्याचा अहवाल देऊनही रस्त्यावर पाठविण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ होत आहे.
14 हजार गाड्या रस्त्यावर धावतात, तेव्हा त्यातील काही गाड्या ब्रेक डाउन किंवा तांत्रिक अडचणी येऊ शकतात. झीरो ब्रेक डाउन पॉलिसी असणे गरजेचे आहे, पण खासगी असो वा शासनाची गाडी, शोरूममधून निघाली तरी ब्रेक डाउन होऊ शकतात. ब्रेक डाउन किंवा तांत्रिक अडचणी कमी कशा करता येतील, याकडे टीम काम करत असते.
– किरण भोसले,
विभागीय वाहतूक अधिकारी