लाल वादळ नाशिकच्या वेशीवर धडकणार

सुरगाणा, पेठ, कळवणचे आंदोलनकर्ते जमा होण्यास सुरुवात

दिंडोरी, सुरगाणा : प्रतिनिधी
किसान सभेचे शेतकरी, शेतमजूर व आदिवासी बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांकरिता दिंडोरी तहसील व इतर ठिकाणी सुरू असलेले बिर्‍हाड आंदोलन दिंडोरी येथे सहाव्या दिवशीही सुरूच आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
आता आंदोलनकर्त्यांनी मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतल्याने सुरगाणा, कळवण, पेठचे आंदोलनकर्ते दिंडोरी येथे जमा होत असून, दिंडोरी तहसील कार्यालय परिसर यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे आंदोलनकर्ते नाशिककडून मुंबईकडे रवाना होणार आहेत.
नाशिक जिल्हा किसान सभा, माकपा, डीवायएफएस व जनवादी महिला संघटनांनी शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या विविध मागण्यांसाठी दिंडोरी तहसील कार्यालयासमोर सहा दिवसांपासून चक्काजाम आंदोलनाचा विडा उचलला आहे. कडाक्याची थंडी, अंधारी रात्र व दिवसाचे तळपते ऊन अंगावर घेत आंदोलक रस्त्यावर ठाण मांडून आहेत. रस्त्यावरच तीन विटांची चूल पेटवून त्यावर खिचडी शिजविली जात आहे. आपले घरदार मागे टाकून आपल्या हक्काच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा ठाम पवित्रा घेतल्याने प्रशासनाची चांगलीच अडचण वाढणार असल्याचे दिसत आहे. याप्रसंगी किसान सभा जिल्हा सेक्रेटरी रमेश चौधरी, माक्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सेक्रेटरी देवीदास वाघ, डीवायएफएस जिल्हा सचिव आप्पा वटाणे यांच्यासह किसान सभा समिती, पक्षाचे तालुका समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, आदिवासी बांधव तहसील कार्यालयासमोर ठाण मांडून बसले आहेत. सुरगाणा, कळवण, चांदवड आणि पेठ तालुक्यातील हजारो आंदोलक गुरुवारी सायंकाळपर्यंत नाशिकच्या वेशीवर धडकणार आहेत.

Red storm will hit the gates of Nashik

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *