सिडको (वार्ताहर )
धुळ्याहून नाशकात येऊन रेकी करून घरफोडी करणाऱ्या संशयितांना अंबड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक करून त्यांच्याकडून २० लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती उपायुक्त परिमंडळ २ चंद्रकांत खांडवी यांनी पत्रकार परिषदेप्रसंगी दिली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ,अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करत असतांना अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत खतेले व हवालदार संजीव जाधव यांना गोपनीय बातमीदारामार्फत एक टोळी धुळ्याहून नाशकात येऊन चोरी करून फरार होत असल्याची माहिती मिळाली.
यावरून वपोनी सुरज बिजली,पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक वसंत खतेले,अंमलदार पवन परदेशी,किरण गायकवाड,सचिन करंजे,दिपक शिंदे,समाधान शिंदे,प्रवीण राठोड,अनिल ढेरंगे,राकेश राऊत,संदीप भुरे,सागर जाधव,जनार्धन ढाकणे,घनशाम भोये,अनिल गाढवे यांनी सापळा रचून सौउद अहमद मोहमद सलीम अन्सारी ( २१,रा. शादाब नगर धुळे ) व हेमंत उर्फ सोन्या किरण मराठे ( २८,रा. शनी मंदिराजवळ,नवनाथ नगर पेठ रोड, नाशिक,मूळ रा. धुळे ) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या धुळ्याच्या साथीदारांसह घरफोडी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्यांचे इतर साथीदार शाकीर उर्फ पप्पू बम इब्राहिम शहा (३२,रा. भोई वाडा धुळे),तैसिफ उर्फ मामू अजीज शहा (३०),समीर सलीम शहा (२३),इस्माईल उर्फ मारी अहमद शेख (२०),वसीम झहिरुद्दीन शेख (३२) ( सर्व रा. धुळे ) यांना धुळ्यातून सापळा रचून अटक करत त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९ व गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ अशा दहा ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी गेलेल्या मुद्देमालापैकी सोने,चांदी,२ टिव्ही,कार,मोबाईल असा २० लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.