लक्षात ठेवा, आनंदानं जगता येतं!

मला खूप टेन्शन आलंय! किंवा मला खूप टेन्शन येतंय! अशा अर्थाचं वाक्य आपण सगळेच रोज बोलत असतो. विशेष म्हणजे वय, लिंग, जात, धर्म, शिक्षण, उत्पन्न यापैकी कशानंही त्यात काही फरक पडत नाही. अनेकदा टेन्शनचे दुष्परिणाम आपल्या तन-मनावर होत असतात. असं असलं तरी काही वेळा टेन्शन आपल्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरत असल्याचाही अनुभव आपल्याला येत असतो. या पार्श्वभूमीवर आपल्याला टेन्शन येतं म्हणजे नेमकं काय होतं? मुळात आपल्याला टेन्शन का येतं? असं टेन्शन येणं योग्य असतं की अयोग्य? आपल्याला हानीकारक ठरणारं टेन्शन कोणतं? आणि आपल्याला उपयुक्त ठरणारं टेन्शन कोणतं? यासारखे अनेक प्रश्न निर्माण होतात.
टेन्शन म्हणजे ताण. हा ताण आपल्या मनात द्विधा निर्माण करतो. हे की ते?, असं की तसं?, आता की नंतर?, हवं की नको? अशा प्रश्नांमुळे मनाची द्विधा अवस्था निर्माण होते. पुढे काय होणार? हा एक प्रश्न आपल्याला कायम भीती दाखवित असतो. परिणामांच्या भयाने आपल्याला आपली भूमिका, मत, विचार, इच्छा, अपेक्षा, आवड, आणि निवड निश्चित करता येत नाही. म्हणून मग ती योग्य पद्धतीनं अभिव्यक्तही करता येत नाही. अशा या अस्थिर स्थितीचा आपल्यावर ताण येतो. त्यालाच आपण टेन्शन असं म्हणत असतो.
आपल्यापैकी सर्वांचा जीवनप्रवास जन्म, शैशव, बाल्य, किशोर, कुमार, युवा, प्रौढत्व, वृद्धत्व या क्रमाने सुरू असतो. खरंतर मजल दरमजल करीत आपण सर्वजण मृत्यूच्या दिशेने वाटचाल करीत असतो. या वाटचालीत आपल्याला पालक, शिक्षक, मित्र, मैत्रिणी, शेजारी, नातलग, कामातील सहकारी मिळत असतात. हे सर्वजण आपल्या जीवनप्रवासातले आपले सहप्रवासी असतात. आपलं संपूर्ण भरण पोषण तेच करीत असतात. अर्थातच या मंडळींच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, बौद्धिक आणि भावनिक सामर्थ्यावर आपल्या भरण-पोषणाचा दर्जा अवलंबून असतो. आपले मित्र-मैत्रिणी वगळता यातील इतर कोणाचीही निवड बहुधा आपल्या हातात नसते. त्यामुळं त्यांच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, बौद्धिक आणि भावनिक सामर्थ्यावर आपलं कोणतंही नियंत्रण नसतं. आपलं जीवनध्येय प्राप्त करताना आपल्याला आवश्यक असणारं भरण-पोषण या मंडळींकडून होऊ शकलं नाही, तर आपल्याला अनेकदा टेन्शनचा सामना करावा लागतो.
सेवा, सुविधा, माहिती, ज्ञान व कौशल्याच्या अभावातून निर्माण होणार्‍या भयाने आपल्या मनात टेन्शन निर्माण होणं स्वाभाविक असतं. काही वेळा आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडत नाहीत. कधी आपल्या प्रयत्नांना पुरेसं यश मिळत नाही. आपल्या विचारांना इतरांकडून अपेक्षित असलेलं समर्थन किंवा स्वीकृती मिळत नाही. असं झालं की आपला अपेक्षाभंग होतो. त्यामुळं आपला मुखभंग किंवा रसभंग होतो. त्यात आपल्याला कमीपणा वाटू लागतो. आपल्या मनात लाज, संकोच, निराशा आणि न्यूनगंड यांसारख्या नकारात्मक बाबींचा जन्म होतो. हे वारंवार, सतत होत राहिल्यानं आपल्याला टेन्शन येतं. ज्याच्या आयुष्यात एकही ताण नाही किंवा तणावाचा एकही अनुभव ज्यानं घेतलेला नाही, असा एकही माणूस आपल्याला शोधूनही सापडणार नाही. तुम्ही अगदी लहान-थोर, गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष असे कुणीही असलात तरी तुमची अशा प्रकारच्या ताणतणावापासून सुटका होत नाही. सांप्रतकाळी अगदी बाल्यावस्थेतल्या व्यक्तीलाही ताणतणावाचा अनुभव येत असल्याचं दिसून येतं. अतिताण किंवा हायपर टेन्शन नावाचा आजार अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात आपलं डोकं वर काढू लागला आहे. कदाचित आपणही अशा प्रकारचा ताण अनुभवत असाल. या ताणांचं नेमकं काय करायचं? असा प्रश्न आपल्याला याक्षणीही छळत असेल. तणावमुक्त होण्याचा विचार तुमच्याही मनात पुनः पुन्हा येऊन गेला असेल. या ताणतणावाचं व्यवस्थापन आपल्याला करता यावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. तशी ती असायलाच हवी. मात्र, ताण तणावांचं व्यवस्थापन करणं म्हणजे ताणतणावांना टाळणं नव्हे! हे आपण नीटपणे समजून घ्यायला हवं. दरवेळी येणारा ताण हानीकारक नसतो. अनेकदा ताण खूप प्रेरक आणि प्रोत्साहित करणारा असतो. असा ताण सकारात्मक ताण म्हणून ओळखला जातो आणि हा सकारात्मक ताण प्रत्येकाच्या आयुष्यात आवश्यक असतो!
आपल्या जीवनातले ताण सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन प्रकारांत विभागले जातात. सकारात्मक ताण हा वैयक्तिक वाढ, प्रगती, सर्जनशीलता, प्रेरणा आणि नवीन आव्हानांचा स्वीकार यांसारख्या गोष्टींना चालना देणारा असतो. परीक्षा, करिअरच्या नव्या संधी, स्पर्धा, नवीन कौशल्य शिकणं किंवा आपल्याला प्रगतीसाठी करावयाचं काम, लग्न यांसारख्या घटनांमध्ये हा सकारात्मक ताण आवश्यक असतो. अशा ताणामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. त्यामुळं आपलं ध्येय व उद्देश गाठण्यासाठी आपण अधिक मेहनत घेतो. आपली कार्यक्षमता आणि सर्जनशीलता वाढण्यास त्याची मदत होते. आपलं मन प्रसन्न राहतं आणि त्यातून आपले वैयक्तिक आणि सामाजिक नातेसंबंध चांगले सुधारू शकतात. सकारात्मक ताणामुळं व्यक्ती जोखीम स्वीकारते. धोरणात्मक विचार करते. सकारात्मक ताण व्यक्तीला जिद्द, प्रेरणा, सुधारणा यासाठी प्रवृत्त करतो. त्यामुळं तिला उद्दिष्टपूर्तीचा अनुभव घेता येतो. त्यानं त्या व्यक्तीचं आत्मिक मूल्य वाढतं. सकारात्मक ताणाच्या योग्य व्यवस्थापनातून व्यक्तीची प्रेरणा, प्रगती व आरोग्य अबाधित राहतं.
याउलट नकारात्मक ताण हा मानसिक किंवा शारीरिक त्रास, चिंता, अस्वस्थता, भीती, चिडचिड, उदासीनता, थकवा, आरोग्याच्या तक्रारी इत्यादी गोष्टींचं मुख्य कारण ठरतो. प्रिय व्यक्तीचा मृत्यू, मोठी आर्थिक समस्या, घात, आघात, अपघात, गंभीर व दुर्धर आजारपण, कायमची नोकरी गमावणं, अवास्तव अपेक्षांचं ओझं, सततच्या कामाचं दडपण यासारख्या घटनांमुळे असा नकारात्मक ताण निर्माण होतो. दीर्घकालीन नकारात्मक ताणामुळे नैराश्य, निद्रानाश, भूक मंदावणं, रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यासारख्या आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. सामाजिक व कौटुंबिक ताण येतो. आत्मविश्वास कमी होतो. काही वेळा व्यक्ती निरुत्साही, असमाधानी, उदास व विवेकहिन होऊन व्यसनाधीन होण्याची शक्यता निर्माण होते. तिच्यातील पलायनवृत्ती वाढीस लागते आणि व्यक्ती समाजापासून दूर होत जाते. अशा व्यक्तीचं शारीरिक, मानसिक, सामाजिक स्तरावर मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. या पार्श्वभूमीवर आपल्या जीवनातील नकारात्मक ताण पुरेसा कमी करून, हवा असलेला सकारात्मक ताण आपल्याला राखता यायला हवा. त्यासाठी ध्यान, श्वासनियमन, शारीरिक व्यायाम, मैदानी खेळ यांसारखे उपाय करायला हवेत. पुरेसा व पौष्ठिक आहार, पुरेशी झोप आणि विश्रांती घ्यायला हवी. आपले कुटुंबीय, निवडक मित्र-मैत्रिणी आणि विविध सामाजिक गट यांच्याशी आपला नियमित व मनमोकळा संवाद व्हायला हवा. आपल्या कामांचे प्राधान्यक्रम ठरवून कामांचा निपटारा होण्याच्या दृष्टीने त्यांची विभागणी करता आली पाहिजे. त्यासाठी आवश्यक असेल तिथे आपल्याला मदत घेता व देताही आली पाहिजे. तसेच आपल्या
स्वतःच्या गरजा, इच्छा, आवडी व निवडींसाठी आपण पुरेसा वेळ दिला पाहिजे. आपल्या जीवनातला सकारात्मक ताण आपण वाढवू शकतो. त्यामुळं आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करता येतो. मानसिक आरोग्य चांगलं राखता येतं आणि आनंदानं जगताही येतं!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *