धोकादायक विद्युत रोहित्र हटवा

मोरदर रस्त्यावरील रहिवाशांची मागणी

मालेगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील वडेल येथील मोरदर रस्त्यावरील घरासमोर असलेल्या विद्युत रोहित्रामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन घरात राहावे लागत आहे. दरम्यान, पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे वीजप्रवाह उतरून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
घराजवळ धोकादायक असलेले रोहित्र हटवण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार करूनदेखील संबंधित विभाग कानाडोळा करत असल्याचा आरोप अशोक महाले यांनी केला आहे. या रोहित्रामुळे लहान मुलांच्या खेळण्यावर बंधने आली आहेत. लहान मुले खेळत असताना रोहित्राचा स्पर्श होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. रोहित्रामुळे वीजतारा लोंबकळत असून, घर्षण होऊन ठिणग्या पडतात.
महावितरण कंपनीच्या या भोंगळ कारभारामुळे जीवितहानी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे महावितरण कंपनीने रोहित्र सुरक्षित स्थळी हलविणे गरजेचे आहे. दुर्घटना घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा दुर्घटना घडण्याआधीच कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.

अनेक दिवसांपासून या रोहित्राचा पत्रव्यवहार करूनदेखील विषय मार्गी लागत नाही. संबंधित यंत्रणेकडून त्याची दखलच घेतली जात नाही. त्यामुळे मोठ्यांसह बालकांचा जीव गेल्यास संबंधित विभाग जबाबदार राहील.
-अशोक महाले, ग्रामस्थ, वडेल

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *