जि. प. सीईओ मित्तल : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक
नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यातील धरण, तलावांतून पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त गाळ काढून सिंचनाची क्षमता वाढवावी. गाळयुक्त शिवारासाठी शेतकर्यांना प्रोत्साहित करावे, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार या योजनेबाबत आढावा बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जिल्हा जलसंधारण अधिकारी आर. एच. झुरावत, उपजिल्हाधिकारी महेश जमदाडे (रोहयो), भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर सांखला, सचिव दीपक चोपडा, जिल्हाप्रमुख ललित सुराणा, समन्वयक अशोक पवार उपस्थित होते. यावेळी या योजनेविषयी जनजागृती करणार्या चित्ररथांना मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखविला.सीईओ मित्तल यांनी सांगितले की, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, नाला खोलीकरण व रुंदीकरण योजनेच्या माध्यमातून जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन करण्याची संधी मिळाली आहे. गाळामुळे जलसाठवणूक क्षमता कमी होते. जिल्हा जल आत्मनिर्भर करण्यासाठी जलसाठ्यांमधून गाळ काढणे, त्यांची निगा राखणे, पाण्याचा अपव्यय टाळून योग्य नियोजनाची आवश्यकता आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनातर्फे ही कामे केली जातील. समन्वयक पवार यांनी भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती देत गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवारासाठी केलेल्या नियोजनाची माहिती दिली.