वाजगाव ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव एकमताने मंजूर

विविध विषयांवर चर्चा; थकबाकी वसुलीसाठी धोरण राबविण्याचा निर्णय

देवळा ः प्रतिनिधी
वाजगाव येथील ग्रामसभेत गावात अवैध देशी दारूविक्री बंद करण्याचा ठराव एकमताने करण्यात आला. वाजगाव-वडाळे ग्रुप ग्रामपंचायतीची ग्रामसभा नुकतीच मारुती मंदिराच्या सभागृहात सरपंच सिंधूबाई सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
वाजगाव-वडाळे ग्रुप ग्रामपंचायतीचे वीस लाख रुपये थकीत असून, थकबाकी वसुलीसाठी कडक धोरण राबविण्याचा निर्णय घेतला गेला. थकबाकीदारांची यादी प्रसिद्ध करून ग्रामपंचायतीच्या फलकावर लावण्यात यावी. जे थकबाकीदार असतील त्यांना कोणत्याही प्रकारचा ग्रामपंचायतीकडून दाखला देऊ नये, तसेच ग्रामसभेत त्यांना विषय मांडता येणार नाही आदी निर्णय घेण्यात आले. दारूविक्रीवर शंभर टक्के बंदी आणण्यासाठी उपाययोजना करावी, अशी सूचना सामाजिक व व्यसनमुक्ती चळवळीचे कार्यकर्ते सुनील देवरे यांनी मांडली असता, दारूबंदीचा ठराव सर्वानुमते मंजूर केला. ग्रामसभेत वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रीतम आहेर यांनी आयुष्मान वय वंदना योजनेची माहिती दिली. तलाठी महेश पवार यांनी अ‍ॅपद्वारे शेतकर्‍यांना ई-पीक पाहणीबाबत मार्गदर्शन केले. वडाळे येथील प्राथमिक शाळेची दुरुस्ती व रंगरंगोटीची मागणी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप सोनवणे यांनी केली. शेतवस्तीवरील घरांची नोंद ग्रामपंचायतीकडे करून घ्यावी, असेे आवाहन ग्रामविकास अधिकारी नूतन देवरे यांनी केले.
ग्रामसभेत दारूबंदीसाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन दारूबंदी समितीने केले. यावेळी सरपंच सिंधूबाई सोनवणे, उपसरपंच सुनील देवरे, पोलीसपाटील निशा देवरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रीतम आहेर, आरोग्यसेवक अशोक जाधव, मीनाक्षी वाघ, आशासेविका प्रमिला मगर, ज्योती अहिरे, रंजना देवरे, ज्योती केदारे, एकनाथ बच्छाव, समाधान केदारे व ग्रामस्थ उपस्थित होते. शुभानंद देवरे यांनी आभार मानले.

दारूबंदीसाठी कारवाईचा इशारा

दारूबंदी समितीचे अध्यक्ष संजय देवरे, उपसरपंच सुनील देवरे, पोलीसपाटील निशा देवरे, ग्रामविकास अधिकारी नूतन देवरे, समितीचे सदस्य गिरीश आहेर, विक्रम देवरे, चंद्रकांत देवरे, आप्पा सोनवणे, तुषार देवरे, शेखर देवरे आदींनी दारू विक्रेत्यांच्या दुकानांवर व घरी भेट देऊन दारूविक्री बंद करण्याची सूचना केली. सूचनांचे पालन न केल्यास उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांकडे तक्रार दाखल करून कारवाईचा इशारा देण्यात आला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *