एक कोटी 81 लाखांचा भरणा; 2,685 करदात्यांना 67 लाखांचा फायदा
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेने गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही करदात्यांसाठी 1 सप्टेंबरपासून अभय योजना सुरू केली आहे. आठवडाभरात 2,685 करदात्यांनी एक कोटी 81 लाखांचा भरणा केला. यातून 67 लाखांची शास्ती करदात्यांना माफ झाली आहे. थकबाकीवर 95 टक्के सवलत करदात्यांना मिळत असून, 31 ऑक्टोबरपर्यंत ही सवलत राहील.
महापालिकेने वर्षानुवर्षे थकबाकी न भरणार्यांवर 2013 पासून शास्ती लागू केली आहे. सध्या शहरातील थकबाकीदारांकडे 347 कोटींची शास्ती थकली आहे. मालमत्ताधारकांनी थकबाकी भरावी व थकबाकीचा डोंगर कमी व्हावा याकरिता महापालिका प्रशासनाने गतवर्षी अभय योजना आणली असता, त्यास करदात्यांनी चांगला प्रतिसाद दिला. सलग तीन महिने अभय योजना राबवली जाणार आहे. सिंहस्थ विकासकामांसाठी आवश्यक असलेला विकास निधी, 15 व्या वित्त आयोगाचा निधी व थकबाकीचा वाढता डोंगर लक्षात घेता महापालिकेच्या विविध कर विभागाने जम्बो सवलत योजना लागू केली आहे. त्यानुसार घरपट्टी थकबाकी एकरकमी अदा केल्यास दंडाच्या रकमेत 95 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे. सवलतीचा लाभ घेण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेण्याबरोबरच महापालिकेतर्फे 3.28 लाख थकबाकीदारांना विशेष नोटीस बजावली जाणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेला स्वनिधी खर्च करण्याच्या सूचना आहेत. त्याअनुषंगाने बांधकामविषयक कामांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. 15 व्या वित्त आयोगाचा निधी हवा असेल तर महापालिकेला शंभर टक्के करवसुली बंधनकारक आहे. वाढती थकबाकी महापालिकेच्या कर विभागासाठी डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे अभय योजना लागू करण्यात आली आहे.
निर्धारित वेळेत कर अदा न केल्यास महापालिकेकडून मासिक 2 टक्के शास्ती लागू होते. शास्तीसह कर अदा न केल्यास नोटीस बजावली जाते. त्यानंतर जप्ती व मालमत्तांचा लिलाव केला जातो. परंतु लिलावाला प्रतिसाद न मिळाल्याने वार्षिक इष्टांकपूर्ती करता येत नाही. त्यात महापालिकेच्या निवडणुकांमुळे मनुष्यबळ त्या कामासाठी लागणार असल्याने या कालावधीत कर वसुलीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
थकबाकीदारांसाठी अभय योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबरदरम्यान शास्तीच्या रकमेत 95 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात आहे. 1 ते 30 नोव्हेंबर कालावधीसाठी शास्तीच्या रकमेत 85 टक्के सवलत दिली जाणार आहे. थकबाकीदारांनी सहकार्य करून त्यांच्याकडील थकबाकी भरावी.
– अजित निकत, उपायुक्त, कर विभाग, मनपा