विश्रांती घेणारे वर्ग
लेखक – ज्योती भारती
दहावी बारावीच्या परीक्षा संपून महिना झालाय; शालेय निकालांसाठी अवघे दोनचार दिवस उरलेत आणि मनात मे महिन्याच्या सुट्टीतील पर्यटनाचे असंख्य ठोकताळे सुरू आहेत. तरीही येता-जाता दिसणाऱ्या रिकाम्या वर्गातील बंद खिडक्या शिक्षकांच्या असंख्य आठवणींना साद घालत राहतात.
वसंत ऋतुतून ग्रीष्माकडे वाटचाल करतांना जाणवणारी अस्वस्थता काहीशी अशीच असते, एरव्ही गजबज असणारं महाविद्यालय एप्रिल महिन्यात वाचनालयाच्या कोपऱ्यापासून ते कॉमनरूमच्या दरवाज्यांपर्यंत शांततेत पहुडलेलं दिसतं! प्रत्येक तासाची बेल वाजली की गजबजून उठणाऱ्या वर्गासमोरील जिन्याच्या पायऱ्या निस्तेजपणा ढवळत बसल्यासारख्या आळशी वाटू लागतात.
महाविद्यालयाच्या प्रांगणातील चिवचिवाट तर अगदी ‘न’ च्या बरोबर; तिथल्या सहेतुक जागा शोधून बसणारे पाखरांच्या जोडीचे थवे …( जे शिक्षकांना बघून किंचित गालात हसतात) ते यावेळी न जानो कोणत्या परिसरात तळ ठोकून बसतात. इथे बसून गुजगोष्टी करण्याची त्यांची वार्षिक वर्गणी एव्हाना संपलेली असते. तरीही काही हुशार खोडकर विद्यार्थी महाविद्यालयाच्या शिपायांशी सूत जमवून इथे बिनधास्त वावरतांना दिसतातच.
प्रत्येक वर्गाचे दरवाजे-खिडक्या-तावदानं, आय.टी’च्या लॅबमधील संगणकं, वाचनालयातील पुस्तकं इ. सर्वच आता किमान एखादं-दीड महिना मनसोक्त निद्रावस्थेत जातात. प्रत्येक मजल्यावर प्रवेश करतांना लागणाऱ्या कॉरिडॉरमध्ये लावलेली विद्यार्थ्यांची हस्तकला, चित्रकला दाखविणारी चित्रं, एखाद्या फेस्टिव्हलची रंगीबेरंगी लोंबकळणारी कागदं मलूल झालेल्या गुलाबांच्या फुलांसारखी निस्तेज वाटू लागतात.
महाविद्यालयातील स्टाफ रूम, जे दरवेळी नव्याने सुरू होणाऱ्या तासाच्या घंटानादावर नजर ठेवून असतं, तेथील वॉर्निंग बेलने सुटकेचा निःश्वास सोडलेला असतो. घटक चाचण्या, प्रथम सत्र, तोंडी परीक्षा यांच्या पेपरतपासणीत तावून सुलाखून निघालेला शिक्षकवर्ग वार्षिक परीक्षेचा अंतिम लेखा-जोखा मांडण्यात निवांत झालेला असतो. वर्षभर वर्गशिक्षक म्हणून दोन तीन पालकांच्या सभा सांभाळणाऱ्या शिक्षकांकडे आता ‘सर/मॅम माझं ओळखपत्र काल फलाण्या-बिस्तन्या शिक्षकांनी वर्गात काढून घेतलं, ते कृपया मला त्यांच्याकडून मिळवून द्या’ अशी गळ घालत फिरणारं अश्वत्थाम्यासारखं कुणी बेरकी पात्र डिस्टर्ब करायला येणार नसतं. अध्ये मध्ये शिक्षकांच्या मेंदूतून वर्षभर तोंडी परीक्षेत अनुपस्थित राहणाऱ्या, वेळेवर प्रकल्प जमा न करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावंही पुटपुटली जातातच, त्यातून वेगळा हास्यकल्लोळ उठत राहतो. आता कोणताही वर्गप्रमुख विद्यार्थी स्टाफ रूमच्या दरवाजातून अमुक तमुक शिक्षकांच्या असण्या-नसण्याची चौकशी करण्यासाठी येणार नसतो. नाही म्हणायला एखादं दोन हुशार नमुने आजही अधनंमधनं मोबाईलच्या वॉट्सअप ग्रुपवर पुढच्या वर्षाची हजरजबाबी चौकशी करतांना भेटत राहतातचं.
तसेच म्हणायला कॉलेजचे कॅन्टीन सांभाळणारे काका/मामाही एव्हाना गावाकडे जायची तिकीटं बुक करून कॅन्टीनचा हंगाम संपविण्याच्या मार्गावर दिसतात.
बाकी मुख्याध्यापकांची केबिन मात्र; येऊ घातलेल्या पुढील वर्षातील प्रवेशाच्या आखणीत गांभीर्याने बुडालेली दिसते. मे महिन्याची सुट्टी या कॅबिनला फारशी मानवणारी नसतेच; येऊ घातलेल्या नव्या वर्षाची नवी मांडणी तिला मोकळा श्वास घेऊ देत नाही.
थोडक्यात; आता महाविद्यालयाचं प्रवेशद्वार ते शेवटच्या मजल्यावरील भिंतीही टळटळीत उन्हाने रापून निघतील. हळूहळू दोन-चार दिवसांत हे थोडे थोडके उरलेले वार्षिक नियोजनांचे ताळेबंदही संपून जातील. क्वचित कुठे कुठे मे महिन्यातील ‘उन्हाळी शिबिरं’ येथे तात्पुरती डोकं वर काढून घोंगावतील पण वर्षा ऋतूच्या आगमनापर्यंत इथली ही अस्वस्थता संपणार नाही.
पहिल्या पावसाच्या सुगंधाबरोबरच बारावीच्या निकालाचे पडघम वाजतील तेव्हा शिक्षक-विद्यार्थी, शिपाई, कॅन्टीनवाले, इ. सगळेच खडबडून महाविद्यालयाची वाट धरतील. पुन्हा नवे गडी पण जुनेच राज्य घेऊन या वर-खाली जाणाऱ्या पायऱ्या धडपडू लागतील अन् इथली प्रत्येक वीट पाऊस-पाण्याचे-बाष्पीभवनाचे, कवितांचे, गणितांचे, खेळांचे, स्पर्धांचे अन् पुनःपरीक्षांचे संदर्भ घेऊन जिवंत होऊ लागेल! तोपर्यंत शाळा/महाविद्यालय नावाची ही निःश्वास टाकणारी वास्तू न्याहाळणे जीवघेणे वाटते!
नवीन वर्षांच्या सुरुवातीला परीक्षेत ‘शाळेचा/ महाविद्यालयाचा पहिला दिवस’ हा निबंध हमखास विचारला जाईल; पण या शेवटच्या दिवसाची आठवण मात्र कुठेही विचारली जात नाही; ती राहते फक्त मनात!
© ज्योती हनुमंत भारती