रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा दागिन्यांची बॅग केली परत

वडाळागाव : प्रतिनिधी
प्रवाशाची रिक्षामध्ये विसरलेली सोन्याचे दागिने व रोकड असलेली बॅग प्रामाणिकपणे परत केली.
या प्रामाणिकपणाबद्दल मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या वतीने रिक्षाचालकाचा सत्कार करण्यात आला.
बडोद्याहून नयन पाटील हे पत्नीसह नाशिक येथे भावाला भेटण्यासाठी आले होते. दुपारी दीडच्या सुमारास नांदूर नाका येथून (एम.एच.15 ए.के.5990) या रिक्षातून मुंबई नाका येथील महामार्ग बस स्थानकात गेले. बसमध्ये बसल्यानंतर त्यांना बॅग रिक्षात विसरल्याची आठवण झाली. त्यांनी तातडीने मुंबई नाका पोलीस ठाण्यात धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाठ व कर्मचारी आकाश सोनवणे, दीपक जगदाळे, मनीषा सोनवणे, समाधान धिवरे आणि शोभा कडवे यांनी तपास सुरू केला. अल्पावधीतच रिक्षाचालक सुनील नरहरी गंधे (59, रा. जेल रोड) यांच्याशी संपर्क साधून त्यांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. बॅगसह पोलीस ठाण्यात येत बॅग सुपूर्द केली. बॅगमध्ये दोन सोन्याच्या पोत व रोख रक्कम असल्याचे पाटील कुटुंबीयांनी स्पष्ट केले.
रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा पाहता वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांनी त्यांचा सत्कार केला. तसेच, बॅग पुन्हा पाटील कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *