सीएनजीसाठी पेट्रोलपंपांवर रिक्षांच्या रांगा

चालकांकडून जादा भाड्याची मागणी; प्रवाशांचा मात्र नकार

नाशिक : प्रतिनिधी
अमेरिका-इस्रायल आणि इराण संघर्षाच्या पाश्वर्र्भूमीवर सीएनजी गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे चित्र नाशिकमध्ये दिसतेे. गेल्या काही दिवसांत सीएनजीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे रिक्षाचालकांत चिंता व्यक्त केली जात आहे. दरवाढीसह काही ठिकाणी गॅसचा पुरवठा मर्यादित होत असल्याने शहरातील अनेक पेट्रोलपंपांवर रिक्षांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसते.
काही दिवसांपूर्वी सीएनजीचा दर 53 रुपये प्रतिलिटर (किलो) होता. मात्र, अचानक झालेल्या वाढीनंतर तो सुमारे 80 रुपयांपर्यंत पोहोचल्याचे रिक्षाचालकांनी सांगितले. त्यामुळे रिक्षाचालकांच्या रोजच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. गॅसच्या वाढलेल्या दरामुळे मिळणारे भाडे व खर्च यात ताळमेळ बसवणे कठीण होत असल्याची प्रतिक्रिया अनेक रिक्षाचालकांकडून व्यक्त केली जात आहे. रिक्षांचालकांकडून जादा भाड्याची मागणी केल्यास नागरिकांकडून ते देण्यास नकार देण्यात येत असल्याने अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत.
दरम्यान, काही पेट्रोलपंपांवर गॅसचा पुरवठा मर्यादित असल्याने रिक्षाचालकांना गॅस भरण्यासाठी दोन ते तीन तास प्रतीक्षा करावी लागतेे. काही ठिकाणी ठरावीक प्रमाणातच गॅस देण्यात येत असल्याचेही सांगितले जातेे. त्यामुळे अनेक रिक्षाचालकांना वेगवेगळ्या पेट्रोलपंपांवर जाऊन गॅस भरण्याची वेळ आली आहे. या परिस्थितीमुळे रिक्षाचालकांचा वेळ वाया जात असून, उत्पन्नावरही परिणाम होत आहे. दरवाढ व गॅस मिळण्यात होणारा विलंब यामुळे रिक्षाचालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सीएनजीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी रिक्षाचालकांकडून करण्यात येत आहे.

सीएनजीच्या दरात अचानक मोठी वाढ झाली आहे. त्यातच पेट्रोलपंपांवर तासन् तास रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे दिवसाचा बराच वेळ वाया जातो. त्याचा कमाईवरही परिणाम होतो.
– मुकेश पाटील, रिक्षाचालक

रिक्षाचालकांकडून जादा भाड्याची मागणी

सीएनजीचे दर वाढल्याने काही रिक्षाचालकांकडून प्रवाशांकडून जादा भाड्याची मागणी केली जाते, अशी तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.

 

 

Rickshaw queues at petrol pumps for CNG

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *