भारताच्या शेजारील बांगलादेशात झालेल्या संसदीय निवडणुकीत उजव्या विचारसरणीच्या बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीला (बीएनपी) दोनतृतीयांश बहुमत मिळाले. ‘बीएनपी’चे प्रमुख तारिक रेहमान आज 17 फेब्रुवारी रोजी पंतप्रधानपदी विराजमान होत आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेहमान यांचे विशेष अभिनंदन करताना बांगलादेशचा उल्लेख ‘पुरोगामी’ केला. पुरोगामी बांगलादेश शेख हसिना यांच्या कार्यकाळात होता. उजव्या विचारसरणीच्या पक्षाकडून पुरोगामित्वाची अपेक्षा ठेवता येत नाही. तेथील लोकांनी ‘बीएनपी’ला निवडून दिले ते बदलत्या राजकीय परिस्थितीत. ऑगस्ट 2024 मध्ये कट्टरपंथीय युवकांनी किंवा जेन झेडने हसिना यांच्या विरोधात उठाव केला. त्याचा परिणाम म्हणजे हसिना यांना देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला. त्यानंतर बांगलादेशात नोबेल शांतता पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकारची स्थापना झाली. हसिना यांच्या बांगलादेश अवामी लीगवर निवडणुकीत सहभाग घेण्यास हंगामी सरकारने बंदी घातली होती. त्यामुळे ‘बीएनपी’समोर मोठे आव्हान नव्हते. आव्हान होते ते जमात-ए-इस्लामी पक्षाचे. पण, हा पक्ष पुरोगामी किंवा धर्मनिरपेक्ष नाही. ‘बीएनपी’सारखाच तो उजव्या विचारसरणीचा आहे. निवडणुकीत बीएनपी आणि जमात-ए-इस्लामी या दोन पक्षांत लढत झाली. काहीही झाले असते तरी उजव्या विचारसरणीच्या धर्मवादी पक्षाकडे सत्ता गेली असती. तारिक रेहमान हे हसिना यांच्यासारखे धर्मनिरपेक्ष नाहीत. ते उजवे आहेत. हंगामी सरकारच्या कार्यकाळात बांगलादेशातील विरोधी पक्षनेत्या बेगम खलिदा झिया यांच्यासह राजकीय कैद्यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर देशात शेख हसिना यांच्याविरोधात आणखी वातावरण तापले. शेख हसिना यांनी देशात धर्मनिरपेक्षता आणली होती. ती धर्मनिरपेक्षता आता राहिलेली नाही. गेल्या काही महिन्यांत हिंदूंवर अत्याचार वाढले. अनेक हिंदूंची हत्या करण्यात आली. दरम्यानच्या काळात ‘बीएनपी’च्या प्रमुख खालिदा झिया यांचे निधन झाले. विजनवासात असलेले त्यांचे पुत्र तारिक रेहमान बांगलादेशात परत आले. त्यांच्या हाती पक्षाची सूत्रे दिली गेली. हंगामी सरकारच्या कार्यकाळात सार्वत्रिक निवडणुका घेण्याचे ठरले होते. त्यानुसार 12 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात आलेल्या निवडणुकांत अपेक्षेप्रमाणे ‘बीएनपी’ला बहुमत मिळाले. शेख हसिना यांच्या बांगलादेश अवामी लीगला निवडणुकीत भाग घेण्यास प्रतिबंध करण्यात आल्याने ‘बीएनपी’चा सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा झाला होता. तारिक रेहमान हेच पंतप्रधान होतील हे स्पष्ट झाले होते. शेख हसिना यांचे सरकार उलथवून टाकल्यानंतर बांगलादेशात पुरोगामित्व राहिलेच नाही. धर्मनिरपेक्षतेनुसार हंगामी सरकारने कारभार केला असता तर हिंदूंच्या हत्या झाल्या नसत्या. मार्च 2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशात गेले होते, तेव्हा तेथील कट्टरपंथीयांनी मोदींच्या दौर्याला विरोध केला होता. दौरा संपवून मोदी मायदेशी परत आल्यानंतर बांगलादेशात मोठा हिंसाचार झाला होता. तेथील धर्मांध आणि कट्टरपंथी शक्तींनी मोदी यांच्या दौर्याला विरोध केला होता. हिफाझत-ए-इस्लाम या इस्लामवादी गटाने मोदी यांच्या दौर्याला विरोध म्हणून राष्ट्रव्यापी बंद पुकारला होता. या गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी बांगलादेशातील हिंदू मंदिरावर हल्ले केले होते. सरकारी कार्यालयांची नासधूस करत अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली होती. संपूर्ण देशभर हिंसाचाराचे लोण पसरले होते. मोदींना दिलेले निमंत्रण मागे घ्यावे, अशीही मागणी करण्यात आली होती. हसिना सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याने हिफाझत-ए-इस्लाम ही संघटना संतप्त झाली आणि हिंसाचार उफाळला होता. कट्टरपंथीयांचे आंदोलन हसिना यांच्याविरोधात असल्याने ‘बीएनपी’ने राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी आंदोलनात तेल ओतले होते. बीएनपी हा इस्लामवादी पक्ष असून, धर्मनिरपेक्षता आणि पुरोगामित्वाला त्याचा विरोध आहे. आपण बांगलादेशला पुरोगामी म्हटले असले तरी सरकार स्थापन करणारा पक्ष पुरोगामी नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. बांगलादेश अवामी लीगनंतर ‘बीएनपी’ हा बांगलादेशमधील सर्वांत मोठा पक्ष आहे. या पक्षाची स्थापना 1 सप्टेंबर 1978 रोजी झिया-उर-रेहमान यांनी केली. या पक्षाची विचारधारा बांगलादेशी राष्ट्रवाद या संकल्पनेवर आहे. धर्मनिरपेक्षतेपेक्षा इस्लामी मूल्यांना सार्वजनिक जीवनात महत्त्व देण्यावर या पक्षाचा भर आहे. ‘बीएनपी’ने 1991-96 आणि 2001-06 या काळात खालिदा झिया यांच्या नेतृत्वाखाली सरकार चालवले होते, तर 2001-06 मध्ये जमात-ए-इस्लामीसोबत आघाडी सरकार स्थापन केले होते. जमात-ए-इस्लामी हा बांगलादेशातील एक प्रमुख इस्लामी राजकीय पक्ष असून, त्याची स्थापना 1941 मध्ये मौलाना अबुल आला मौदुदी यांनी केली होती. बांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतर या पक्षाची वेगळी शाखा कार्यरत झाली. या पक्षाची विचारधारा इस्लामवर आधारित राज्यव्यवस्था, शरीयत कायद्याला महत्त्व आणि पाश्चिमात्य धर्मनिरपेक्षतेला विरोध अशी आहे. सन 1971 च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या
काळात जमात-ए-इस्लामीवर पाकिस्तानच्या बाजूने भूमिका घेतल्याचा आणि युद्ध गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचा आरोप झाला, ज्यामुळे त्याची प्रतिमा वादग्रस्त ठरली होती. सन 2001-06 या काळात बीएनपीसोबत आघाडी सरकारमध्ये सहभाग घेतला होता, परंतु नंतर अवामी लीग सरकारने युद्ध गुन्ह्यांच्या खटल्यांमुळे या पक्षाच्या अनेक नेत्यांना शिक्षा केल्या. सन 2013 नंतर पक्षावर निवडणूक लढवण्यास निर्बंध आले. आजही हा पक्ष संघटनात्मक पातळीवर अस्तित्वात असला तरी राजकीयदृष्ट्या तो कमकुवत आहे. या पक्षाला आता विरोधात बसावे लागणार आहे. सत्ताधारी व विरोधी अशा दोन्ही पक्षांची राजकीय विचारधारा एकसमान असल्याने बांगलादेशात पुरोगामी आणि धर्मनिरपेक्षतेची अपेक्षा ठेवता येणार नाही. नवीन सरकारच्या कार्यकाळात भारत-बांगलादेश संबंधित सुधारणा होईल, अशी अपेक्षा असली, तरी शेख हसिना यांना भारतात आश्रय मिळाला आहे. तेथील हंगामी सरकारने हसिना यांना परत पाठविण्याची मागणी भारताने मान्य केली नव्हती. तीच मागणी तारिक रेहमान यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारकडून केली जाण्याची शक्यता आहे. तशी मागणी झाल्यास भारताला विचार करावा लागेल. बांगलादेशात लोकशाही मार्गाने नवीन सरकार येणार असले, तरी ते इस्लाम धर्मवादी राहणार असून, धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामीही नसेल. घटनात्मकदृष्ट्या बांगलादेश हा धर्मनिरपेक्ष देश आहे. मात्र, प्रत्यक्ष राजकारणात धार्मिक भावनांचा वापर वाढत चालला आहे. स्वातंत्र्यानंतर अवामी लीगने धर्मनिरपेक्ष राष्ट्राची संकल्पना मांडली असली, तरी बीएनपी इस्लामिक राष्ट्रवादाची कल्पना मांडण्यास मागेपुढे पाहणार नसल्याची शक्यता नाकारता येत नाही. तारिक रेहमान यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1965 रोजी ढाका या ठिकाणी झाला. त्यांचे वडील झिया उर रेहमान हे बांगलादेशचे माजी राष्ट्रपती आणि लष्करप्रमुख होते. अशा कुटुंबात जन्मलेले राजकारण त्यांच्या आयुष्याचा एक नैसर्गिक भाग बनले. त्यांनी बांगलादेशमध्ये शिक्षण घेतले आणि लहानपणापासूनच पक्षाच्या कार्यात सहभागी झाले. तारिक रेहमान यांनी 1990 च्या दशकात सक्रिय राजकारणात प्रवेश केला. 2001 मध्ये जेव्हा ‘बीएनपी’ सत्तेत आला तेव्हा त्यांची भूमिका अचानक अत्यंत महत्त्वाची बनली होती. त्यांनी औपचारिकपणे कोणतेही मोठे सरकारी पद भूषवले नसले, तरी पक्ष आणि सरकार दोन्हीमध्ये त्यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येत होता. 2001 ते 2006 हा काळ त्यांच्यासाठी सर्वांत वादग्रस्त होता. या काळात त्यांच्यावर भ्रष्टाचार, खंडणी, सत्तेचा गैरवापर आणि राजकीय हिंसाचाराचे अनेक आरोप होते. 2004 मध्ये अवामी लीगच्या प्रमुख शेख हसिना यांच्यावरील ग्रेनेड हल्ल्यातही त्यांच्यावर आरोप होते.
Right Tariq Rehman
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…