नाशिक : पूर्वा इंगळे
शहरातील गोदघाट परिसरात पावसामुळे जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावर सांडपाणी व पावसाचे पाणी एकत्र आल्याने वाहतूक कोंडी होत आहे. उघड्या मॅनहोलमुळे अपघाताचा धोका अधिक वाढला असून, दुचाकीस्वार आणि पादचारी यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
गोदघाट परिसरातील स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार, दरवर्षी पावसाळ्यात अशीच परिस्थिती उद्भवते. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे पावसाचे पाणी योग्य पद्धतीने नाल्यात न जाता रस्त्यावर साचते. त्यामुळे दुचाकी घसरून पडणे, वाहनांचे नुकसान होणे अशा घटना घडत आहेत. नवरात्रोत्सव, घटस्थापनामुळे परिसरात नेहमीच भाविकांची वर्दळ असते.
शहरातील नैसर्गिक नाले, रस्ते आणि पावसाळी गटारींतून पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने झाला नाही, तर रस्त्यावरच पाणी साचते. शहरात सुमारे 13 हजार 946 चेंबर आहेत. पावसाळी नाले वेळोवेळी साफसफाई व दुरुस्ती करणे आवश्यक असते. त्यामुळे महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत दरवर्षी शहरातील नैसर्गिक नाले, चेंबर्स, पावसाळी खुली गटार यांची साफसफाई केली जाते. यंदा मात्र महापालिकेने ठेकेदार निश्चित केले नसल्याने वेळेत कामे सुरू होऊ शकली नाहीत.
खरे तर धार्मिक तसेच पौराणिक महत्त्व लाभलेला गोदाघाट परिसर आयकॉनिक पर्यटनस्थळ म्हणून विकसित केला जाणार असल्याचे नमूद करत केंद्राच्या रामकाल पथ प्रकल्पाची पूर्ण क्षमतेने अंमलबजावणी करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. सध्या परिसरात नेहमीच भाविकांची वर्दळ असते.
पाणी दूषित होण्याची शक्यता
सध्या या भागात चेंबर उघडे असल्याने त्यात हवेने आजूबाजूचा केरकचरा, घाण साचते. पावसाळ्यात खड्ड्यात गाळ साचून पाणी दूषित होण्याची शक्यता वाढते. रस्त्यावर नेहमी वर्दळ असल्याने एखादी व्यक्ती अथवा लहान मुले त्यात पडून अपघात होण्याचा धोका आहे. त्यामुळे स्वच्छता, सुरक्षितता आणि वाहतुकीची योग्य व्यवस्था करणे गरजेचे आहे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. महापालिकेने तातडीने उघड्या मॅनहोलला झाकण बसवावे व पावसाळ्यातील दूषित पाणी रस्त्यावर साचणार नाही, यासाठी पावले उचलावीत.