रस्त्यांचा प्रश्न गंभीर; भंगार दुकानांचे आक्रमण!

प्रभाग- 30

प्रभाग क्रमांक 30 मध्ये कॉलेज रोड, गंगापूर रोड यानंतर उच्चभ्रू, उच्चशिक्षित समजला जाणारा परिसर असे इंदिरानगर परिसराला गणले जाते. यासोबतच वडाळा, राजीवनगर यांसारख्या वसाहतीदेखील आहेत. त्यामुळे प्रभाग वरवर छान वाटत असला, तरी वसाहतींमध्ये अनेक नागरी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रभागात अनेक समस्यांनी विळखा घातला आहे.
मुख्य रस्ते सोडता कॉलनी भागातील रस्त्यावर बरेच खड्डे पडले आहे. अनेकदा अस्तरीकरण करूनदेखील पावसाच्या पाण्यासोबत खडी वाहून जाते व पुन्हा खड्डे पडतात. परिसरात जुन्या पाण्याच्या जोडण्या आहेत. त्यामुळे पाइप गंजल्याने गळती होऊन पाणी वाया जाते व घरापर्यंत पुरेसे पाणी पोहोचत नाही. त्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. शिवाय गळतीच्या कारणामुळे गढूळ पाणी येणे हीदेखील समस्या या भागात पाहायला मिळते. उद्यानांना बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यातील अनेक खेळण्या मोडकळीस आल्या आहेत .त्याकडे उद्यान विभागाचे लक्ष नाही. शिवाय संपूर्ण उद्यानात गवत वाढले आहे. त्यामुळे मुलांना खेळण्यांपर्यंत जाणे शक्य होत नाही. विजेचा लपंडाव हा तर इंदिरानगर भागाचा कायमचाच प्रश्न झाला आहे. सलग दोन-तीन तास वीजपुरवठा खंडित राहतो. शिवाय कमी-अधिक दाबाने वीजपुरवठा होतो. विजेच्या लपंडावामुळे व्यावसायिकांना व्यवसाय करणे अडचणीचे ठरते.
वडाळा भागातून अवजड वाहनांची वाहतूक सुरूच आहे. या वाहतुकीमुळे अपघात होऊन अनेक जण मरण पावले आहेत. तरीदेखील आजही चोरमार्गाने अवजड वाहतूक सुरू आहे. अनधिकृत भंगार गोदाम हा मोठा प्रश्न वडाळा भागात निर्माण झाला आहे.
अंबड लिंक रोडवरील भंगार बाजार काढल्यानंतर तेथील भंगाराची दुकाने वडाळ्यात आली आहेत. याठिकाणी अनेक वेळा आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या आत जाऊ शकत नाहीत इतके अरुंद रस्ते अतिक्रमणांमुळे झाले आहेत. अनधिकृत भंगार गोदामात विजेची चोरी, पाण्याची चोरी पाहायला मिळते. अनधिकृत गोठे स्थलांतरित करावेत, अशी मागणी अनेक वर्षांची आहे. मात्र, तसे न झाल्याने तेथील मलमूत्र रस्त्यावर येते व त्यामुळे दुर्गंधी पसरते. राजीवनगर वसाहतीतदेखील अनेक नागरी समस्या आहेत. तेथील शंभर फुटी रोडवर अतिक्रमण झाले आहे. वाहतुकीला याचा अडथळा निर्माण होतो आहे.
मागील निवडणुकीत प्रभागात चारही उमेदवार भारतीय जनता पक्षाचे निवडून आले आहेत. यात अ‍ॅड. श्याम बडोदे, सुप्रिया खोडे, डॉ. दीपाली कुलकर्णी, सतीश सोनवणे यांना नागरिकांनी मोठा मताधिक्क्याने निवडून दिले होते. वडाळ्यातूनदेखील यावेळी भाजपाला चांगले मतदान झाले होते. शिवसेनेच्या उमेदवारांना ऐनवेळी ए-बी फॉर्म न मिळाल्याने त्यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागली. त्याचा फायदा भाजपाला झाल्याचे दिसले. यापूर्वी या परिसरातून शिवसेनेचा उमेदवार निवडून येत होता. मात्र, नंतर मनसे व आता भाजपाचे उमेदवार निवडून आले आहेत.
या नगरसेवकांनी नागरिकांना केवळ मूलभूत सुविधा पुरविण्यापुरतेच न थांबता बॅडमिंटन हॉल, कलानगर येथील सिग्नल यंत्रणा, मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण, कलानगर येथील जलकुंभ, पांडवनगरी ते साठेनगरपर्यंतची जलवाहिनी, अशी महत्त्वाची कामे पूर्ण केली आहेत. प्रभागात दलित वस्ती व अल्पसंख्याक निधीतून वडाळा गावातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण, पांडवनगरी ते अण्णा भाऊ साठेनगरपर्यंत जलवाहिनी टाकून पाणीप्रश्न मार्गी लावणे, जलतरण तलावासाठी जागा उपलब्ध करून देणे, ही कामे उल्लेखनीय आहेत. संताजीनगर येथे स्वतंत्र पाण्याची टाकी उभारण्याचे काम विशेष महत्त्वाचे ठरते.
यंदा महाविकास आघाडीच्या बाजूने निवडणुकीसाठी जोरात तयारी सुरू आहे. युतीबद्दल संशकता असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या वतीने मोर्चेबांधणी सुरू आहे. माजी आमदार वसंत गिते यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उबाठाकडून नवीन खेळी खेळली जाऊ शकते. शिवसेना शिंदे गटाच्या वतीनेदेखील स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे निवडणुकांत चांगलाच रंग भरला जाणार आहे.

विद्यमान नगरसेवक

                                                              सतीश सोनवणे

                                                              अ‍ॅड. श्याम बडोदे

                                                               डॉ. दीपाली कुलकर्णी

                                                               सुप्रिया खोडे

प्रभागाचा परिसर

राणेनगर, इंदिरानगर, लिंकरोडच्या उत्तरेकडील भाग, राजीवनगर, वैभव कॉलनी, किशोरनगर, कानिफनाथनगर, चार्वाक चौकापर्यंत, वडाळागाव, सादिकनगर, मेहबूबनगर, गुलशननगर, चिंतामणी कॉलनी, श्रद्धा विहार, शिवकॉलनी, पांडवनगरी, गुरू गोविंद सिंंग पॉलिटेक्निक परिसर.

प्रभागातील विकासकामे

• विद्यार्थ्यांसाठी प्रशस्त अभ्यासिका व वाचनालय.
• बॅडमिंटन हॉलची निर्मिती.
• जलतरण तलाव.
• कलानगर येथील जलकुंभ.
• पांडवनगरी ते साठेनगरपर्यंतची जलवाहिनी.
• वडाळागावात रस्त्याचे काँक्रीटीकरण, भूमिगत गटारीचे काम.
• दलित वस्ती व अल्पसंख्याक निधीतून वडाळा गावातील रस्त्याचे काँक्रीटीकरण.

प्रभागातील समस्या

• उद्घाटनाअभावी वडाळा येथील अभ्यासिका वापराविना बंद.
• वडाळा येथे अनधिकृत भंगार बाजार.
• वीजपुरवठा सुरळीत नाही.
• जनावरांचे अनधिकृत गोठे व त्यातून होणारी दुर्गंधी.
• जुने पाणीपुरवठा कनेक्शन. त्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा.
• प्रभागात 40 खाटांचे रुग्णालय असूनही त्यात फक्त ओपीडी चालते. प्रसूतिगृह नाही.

इच्छुक उमेदवार

सतीश सोनवणे, अ‍ॅड. श्याम बडोदे, आकाश खोडे, गायत्री आकाश खोडे, सागर देशमुख, देवानंद बिरारी, अ‍ॅड. निकितेश धाकराव,
योगेश दिवे, जय कोतवाल, प्रकाश खोडे, संजय गायकर, शकुंतला खोडे, अर्चना जाधव, अ‍ॅड. अजिंक्य साने, डॉ. दीपाली कुलकर्णी, अनिता सतीश सोनवणे, श्वेता लासुरे, धीरज भोसले, रमीज पठाण, राजेश भोसले, नरेंद्र
शेखावत, संदीप जगझाप, पूजा देशमुख, डॉ. दीपिका जगझाप, सुरेंद्र कोथमिरे, संतोष कमोद, सोनाली कुलकर्णी, शाजिया शेख, उषा साळवे, उज्ज्वला जाधव, वैशाखी सोनार, आशाबी शेख, संतोष गोवर्धने, राजेश भोसले, नईम शेख, नीलेश साळुंखे.

2011 नुसार लोकसंख्या

•  ♦ लोकसंख्या : 47,763
• • ♦ अनुसूचित जाती : 8,099
• • ♦ अनुसूचित जमाती 2,224

नागरिक म्हणतात…

परिसरात कमी दाबाने पाणी येते. मंगलानगर परिसरात अनेक झाडे आहेत. त्या झाडांचा पालापाचोळा उचलायला वेळेवर गाडी येत नाही. त्यामुळे परिसरात घाण निर्माण होते. पावसाळ्यात कचरा सोडून दुर्गंधी निर्माण होते.
– तबाजी दाते, ज्येष्ठ नागरिक, इंदिरानगर

पांडवनगरी भागात कमी दाबाने पाणी येते. कॉलनी भागातील रस्ते खराब झाले आहेत. त्यांची दुरुस्ती वेळेत होत नाही. सम्राट स्वीट चौकात पावसाळ्यात पाणी तुंबते. त्यामुळे नागरिकांना ये-जा करणे अडचणीचे ठरते. मोकळ्या मैदानावर गाजरगवत वाढले आहे. परिसरात धूर फवारणी होत नाही. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
– विमल गावंडे, गृहिणी, पांडवनगरी

वडाळागावात मागील दहा वर्षांपासून अनधिकृत भंगार गोदाम उभारले गेले आहेत. या भंगार गोदामांना अनेक वेळा आग लागली आहे आणि या ठिकाणी कच्चा माल पहाटे जाळला जातो. या प्रकारामुळे लोकांना नाक-कान-डोळ्यांचे विकार झाले आहेत. त्वरित हे भंगार गोदाम परिसरातून हद्दपार केले पाहिजे. तसेच अनधिकृत नळजोडणी केली जाते.
– ईश्वर पवार, वडाळा

मी पहिल्यांदा मतदान करणार आहे. युवक असल्याने मला माझा प्रभाग भयमुक्त, नशामुक्त असावा, असे वाटते. परिसरात योग्य अभ्यासिकेची सोय नाही. मैदानी खेळ खेळण्यासाठी मैदान नाही. उद्यानामध्ये गाजरगवत वाढले आहे. त्यामुळे लहान मुलांना तिथे खेळता येत नाही.
– सर्वेश खैरनार, कलानगर

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *