आई-मुलगा जखमी, दागिन्यांसह लाखोंचा ऐवजावर डल्ला
सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील वडगाव-पिंगळा येथे गुरुवारी (दि.24) रात्री 7.30 वाजेच्या सुमारास 7 ते 8 जणांच्या टोळक्याने ज्ञानेश्वर कोंडाजी हुल्लुळे यांच्या वस्तीवर धूडगूस घालत माय-लेकाचे हातपाय बांधून तोंडाला चिकटपट्टी लावून महिलेच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने ओरबाडून नेले. त्याचबरोबर कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कमेसह लाखो रुपयांचा ऐवजावर डल्ला मारल्याची घटना घडली.
या दरोड्यात महिलेच्या कानाला आणि गळ्याला जखम झाली असून त्यांच्यावर शिंदे, ता. नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
वडगाव-पिंगळा येथे आईभवानी मंदिराजवळ वास्तव्यास असलेले ज्ञानेश्वर कोंडाजी हुल्लुळे गुरुवारी टोमॅटो विक्रीसाठी नाशिक येथे गेले होते. यावेळी त्यांची पत्नी मुक्ताबाई हुल्लुळे (50), मुलगा राहूल हुल्लुळे (32) हे दोघेच घरी होते. 7.30 वाजेच्या सुमारास ते हॉलमध्ये टी.व्ही. बघत असताना पुढच्या दाराने अचानक 7 ते 8 जणांच्या टोळक्याने घरात प्रवेश केला. हातात लाठ्या-काठ्या असलेल्या हिंदीभाषिक दरोडेखोरांनी मुक्ताबाई व राहूल यांना बांधून ठेवले, तोंडाला चिकटपट्टी लावली व लाठ्या-काठ्यांनी मारहाण करत मुक्ताबाईच्या गळ्यातील व कानातील दागिने ओरबाडून घेतले. यावेळी मुक्ताबाई यांच्या दोन्ही कानांना जखम झाली. एवढ्यावरच न थांबता दरोडेखोरांनी घरात असलेल्या कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन पोबारा केला.
त्यानंतर घाबरलेल्या राहूलने सरपटत जात झटापटीत बाजूला पडलेला मोबाईल जवळ करुन मित्र विशाल विंचू याला फोनवरुन घटनेची माहिती दिली. त्यानंतर गावातील तरुणांनी या वस्तीकडे धाव घेतली व मायलेकाची सुटका केली. पोलिस पाटील सागर मुठाळ, अजय हुल्लुळे यांनी सिन्नर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान रात्री उशिरा पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, हवालदार नवनाथ शिरोळे, आर.एफ. पगार आदींसह पोलिस कर्मचारी परिसरात दरोडेखोरांचा शोध घेत होते.