भीतीपोटी शाळेला सुट्टी; ड्रोनच्या सहाय्याने शोध
नाशिक : प्रतिनिधी
शहरातील भोसला मिलिटरी स्कूल परिसरात बिबट्या फिरत असल्याची चर्चा काल (दि.17) सकाळपासून सोशल मीडियावर सुरू होती. परिसरातील नागरिकांनीही दक्षता म्हणून वन विभागाला कळविले होते. यासंदर्भात माहिती मिळताच वन विभागाच्या वन्यप्राणी बचाव पथकासह गंगापूर पोलीस स्टेशनचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसरात घनदाट झाडी व उंच गवत असल्याने शोधमोहीम आव्हानात्मक ठरत होती. ड्रोनच्या सहाय्याने व्यापक तपासणी सुरू असल्याची माहिती वन विभागाने दिली.
शाळेच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाशी चर्चा करून दुपारचे सत्र तत्काळ रद्द करण्यात आले होते. सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण न येता स्कूल व्हॅनच्या माध्यमातून सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. वन विभागाने राबविलेल्या शोधमोहिमेत कोणताही ठोस पुरावा अथवा बिबट्याचा वावर आढळलेला नाही. त्यामुळे दक्षता म्हणून वन विभागाचे पथक परिसरात सतत गस्त घालत आहे. शोधमोहीम सुरू ठेवली. संशयित ठिकाणी आठ ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत. शाळेतील आधीपासून असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यांची तपासणी शाळा प्रशासनाच्या मदतीने करण्यात आली. परिसरातील वाढलेले दाट गवत व झाडी हटविण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवण्यासही शाळा प्रशासनाने सुरुवात केली आहे. रात्री वन विभागाच्या पथकांकडून थर्मल ड्रोनच्या मदतीने परिसरात शोधमोहीम राबवली जाणार आहे.
नागरिकांना आवाहन
वन विभागाने स्पष्ट केले की, परिसरात घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. कोणतीही माहिती तथ्य पडताळणी न करता सोशल मीडियावर अफवा स्वरूपात प्रसारित करू नये. कुठेही बिबट्याचा वावर आढळल्यास त्वरित वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.