धावते मातृत्व

शिक्षण…करिअर…नोकरी…या सगळ्या गोंधळात इतका वेळ होऊन जातो कधी 35-40 ओलांडते याचा अंदाजच येत नाही. आणि या सगळ्यांनतर मग लग्नाचा विचार होतो.
आणि यानंतर अर्थात आई-बाबा होण्याचा… तोपर्यंत बहुतेक 35-40 ओलांडलेली असते. आई-बाबा दोघांनाही.
सृदृढ मूल जन्माला घालण्याचे योग्य वय 20-30…
याच कालावधीत एक सुदृढ मूल जन्माला येऊ शकते. जसेजसे आईचे वय वाढते तसतसे जोखीम वाढत जाते. याच वयात नानाविध आजार बळावलेले असतात. आणि मग डॉक्टर म्हणतात…तुमची डिलिव्हरी कॉम्प्लिकेटेट वाटते हं…
मग पुन्हा महागड्या मेडिसीन..ट्रीटमेंट…
त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे तो वाढते प्रदूषण.
या प्रदूषणामुळे आपण श्वास घेतो ती हवासुद्धा शुद्ध राहिली नाही. योग्य आहार नाही, जीवनशैली बदललेली…
मोठमोठ्या शहरांत भावी मातासुद्धा व्यसनाला बळी पडलेल्या आहेत… का तर म्हणे पाश्चिमात्य संस्कृती. अशा या भावी माता 35-40 नंतर आई होण्याचा निर्णय घेतात. त्यात गर्भात मूल आहे याचे भानही न ठेवता आपली जीवनशैली आहे तशीच सुरू ठेवतात. अशा या प्रदूषित वातावरणात व प्रदूषित गर्भात जन्माला येणारे मूल कसे हो सुदृढ असेल?
मुंबईत झालेल्या एका सर्व्हेनुसार सन 2016 नंतर सुमारे 60 टक्के मुलांना जन्मत: हृदयाचे विकार आहेत. काही व्यंग जन्माला आलेले आहेत. आता गर्भात असणारे व्यंग आधीच लक्षात येते. त्यामुळे वेळेवर लक्षात येताच अशा मुलांचा जन्म थांबविता येतो; परंतु काही व्यंग असे असतात की, ते जन्माला आल्यावरच लक्षात येतात. काही मतिमंद जन्माला येतात.
याही पलीकडे असतात.. त्या आयटी सेक्टरमध्ये काम करणार्‍या भावी माता…
महिन्याला दोन-दोन लाख पगार घेणार्‍या मातांना नऊ महिने मूल पोटात वाढविणे म्हणजे मोठी अडचणच असते. त्यात दुसरीकडे भावी बाबा अन् आई हा हिशेब करत असतात की, मूल जन्माला घालेपर्यंत किती लाखांचे नुकसान होणार…?
मग यांचे पाय वळतात सरोगसीकडे.
सध्या अशा भावी माता-पित्याचे नुकसान लक्षात घेता सरोगसी मदरचा ट्रेंड वाढता आहे. सध्या तो सिनेकलाकारांत वाढता आहे. मध्यंतरी शाहरुख खानच्या पत्नीनेही सरोगसीच्या माध्यमातून मुलाचा जन्म दिल्याचे वाचनात आले होते.
मुलाला जन्माला घालण्याइतपत वेळ नाही असे हे भावी माता-पिता… यापुढे जाऊन पुन्हा कमावत्या मातांना या मुलांच्या संगोपनाची अडचण वाटायला लागली आहे. आई-वडील त्या मुलाचे भविष्य चांगले घडावे याकरिताच रात्रंदिवस राबराब राबत असतात. नव्हे, त्यांना लक्झरियस लाइफ देण्यासाठी ते कटिबद्ध असतात. अशा या कमावत्या भावी माता-पित्यांनी भविष्यात मूल दत्तक घेण्यावरच भर दिला तर नवल वाटू नये… त्यातही जरा समजदार मूल…जेणेकरून सुरुवातीच्या दोन-तीन वर्षांच्या बालसंगोपनाचे कष्ट वाचतील. असो. यामुळे बिचार्‍या अनाथाश्रमातील मुलांना म्हातारे का असेना चाळिशीतील आई-बाबा तरी मिळतील…
गंमत नाहीये ही… वेळ आली आहे स्वत: अंतर्मुख होण्याची.
मी माझे लग्न कितव्या वर्षी करतेय/करतोय? माझं आई-बाबा होण्याचं आदर्श वय काय? मला माझं करिअर महत्त्वाचं आहे की माझं आरोग्य… या आणि यांसारख्या अनेकाविध प्रश्नांची उत्तरे आपणच आपल्याला द्यायला हवीत. अन्यथा पुढे जाऊन मुलांनाच पालक दत्तक घेण्याची वेळ आली तर नवल नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *