सटाण्यात अवैध, अनैतिक व्यवसायावर ग्रामीण पोलिसांचा छापा

शहरात खळबळ; इतर लॉजवरही कारवाईची शक्यता

सटाणा : प्रतिनिधी
शहरातील काही लॉजमध्ये अवैध व अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिटला मिळाल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या माहितीच्या आधारे सटाणा बसस्थानकासमोरील लक्ष्मी लॉज येथे पोलिसांनी अचानक छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत लॉजचा चालक, दोन महिला, तसेच अन्य तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. लॉजमध्ये सुरू असलेल्या संशयास्पद हालचालींमुळे अनैतिक व्यवसाय चालविला जात असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी लॉजमध्ये गेल्या काही काळापासून संशयास्पद हालचाली सुरू असल्याबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या. याची खात्री झाल्यानंतर शनिवारी (दि.10) सायंकाळी विशेष पथकाच्या पोलिसांनी छापा टाकला.
छाप्यादरम्यान तालुक्यातील मुंजवाड व नामपूर येथील दोन महिला, काही नागरिक तसेच आक्षेपार्ह साहित्य आढळले. याप्रकरणी लक्ष्मी लॉजचा चालक नाना गाडेकर तसेच दत्तात्रय चौधरी, हर्षल गुरुडकर (रा. सटाणा) यांच्याविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, ही कारवाई शहराच्या मध्यवर्ती व अत्यंत वर्दळीच्या बसस्थानक परिसरात करण्यात आली आहे. दररोज हजारो प्रवासी, महिला, विद्यार्थी व नागरिकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी अशा प्रकारचे अवैध व्यवसाय सुरू असणे, ही बाब गंभीर मानली जात आहे. नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ‘हे प्रकार इतक्या दिवसांपासून सुरू असताना संबंधित यंत्रणा काय करत होती?’ असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्वांची सखोल चौकशी सुरू केली आहे. यामागे नेमके कोणते जाळे कार्यरत आहे, तसेच शहरातील इतर लॉजमध्येही असे प्रकार सुरू आहेत का, याचा तपास केला जात आहे. तपासाअंती दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पोलीस कारवाई सातत्याने व्हावी

या कारवाईनंतर शहरातील इतर लॉज व निवासस्थानीही बेकायदेशीर धंदे सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. पोलीस प्रशासनाने अशा ठिकाणीही अचानक छापे टाकावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या धडक कारवाईचे शहरातील नागरिक, महिला संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे. मात्र, ही कारवाई केवळ एकदाच न राहता सातत्याने व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

 

Rural police raid illegal, unethical business in Satana

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *