ऋतुजा लटके यांना दिलासा

राजीनामा स्वीकारण्याचे मनपाला निर्देश
मुंबई : प्रतिनिधी
हायकोर्टाने अखेर ऋतुजा लटके यांना दिलासा दिला आहे. त्यांचा राजीनामा उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत स्वीकारून तो मंजूर करावा, असे निर्देश कोर्टाने दिले. राजीनामा मंजूर होत नसल्याने लटके यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. हा राजीनामा स्वीकारण्यात यावा, असे कोर्टाने पालिकेला बजावले. यानिर्णयाने ठाकरे गटालाही दिलासा मिळाला असून, आता त्या आज ठाकरे गटाकडून अंधेरी पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार आहेत. लटके या ठाकरे गटाकडून उमेदवारी करणार असल्याने त्यांचा राजीनामा मंजूर होऊ नये म्हणून महापालिकेच्या प्रशासनावर मोठा दबाव होता, असा आरोप अनिल परब यांनीही केला होता. आपला राजीनामा मंजूर व्हावा म्हणून लटके यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. याचिका सुनावणीला आली असताना महापालिकेने लटके यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांना राजीनामा लवकर मंजूर करावा, अशी मागणी करण्याचा अधिकारच नाही, असा युक्तिवाद महापालिकेने केला. यावर न्यायालयाने भ्रष्टाचाराची तक्रार कधी केली? असा सवाल केला. त्यावर महापालिकेच्या वकिलाने कालच तक्रार दाखल झाल्याचे सांगितले. मात्र, न्यायालयाने हा मुददा नाकारत लटके यांचा राजीनामा मंजूर करावा, असे निर्देश मनपाला दिले. या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठाच दिलासा मिळाला आहे. लटके यांची उमेदवारी होऊ नये म्हणून सत्ताधार्‍यांनी मोठे प्रयत्न केले. मात्र, न्यायालयाने लटके यांच्या बाजूने निकाल देत सत्ताधार्‍यांचे मनसुबे उधळून लावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *