जिल्हाधिकार्यांसह मनपा आयुक्तांची साधुग्राममध्ये पाहणी
नाशिक : प्रतिनिधी
दोन वर्षावर सिंहस्थ कुंभमेळा येऊन ठेपला आहे. प्रशासनाकडून त्याद़ृष्टीने तयारी सुरू केली आहे. दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी एक हजार जागा कायमस्वरूपी अधिगृहीत करावी, अशी आग्रही मागणी साधू-महंतांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा व मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडे केली.
जुना आडगाव नाका येथील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात सिंहस्थाबाबतच्या विविध प्रश्नांविषयी साधू-महंतांसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त व सिंहस्थ प्राधिकरणाच्या आयुक्त करिष्मा नायर यांंनी श्री दिगंबर अनी आखाडा, श्री लक्ष्मी नारायण मंदिर, तपोवनातील कपिला संगम येथे भेट देत तेथील साधू, महंत यांच्याशी बुधवारी संवाद साधला. यावेळी राष्ट्रीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते महंत डॉ. रामकिशोर शास्त्री, दिगंबर आखाड्याचे महंत डॉ. भक्तीचरणदास महाराज, रामस्नेहीदास महाराज, महंत शंकरदास महाराज, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, पोलिस उपायुक्त चंदक्रांत खांडवी, तहसीलदार अमोल निकम, माधवदास राठी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, की साधुग्रामसाठी भूसंपादन करताना शेतकर्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेण्यात येईल. तपोवन परिसरातील शेतकर्यांशी संवाद साधताना सांगितले. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातून साधू, महंत येतील. त्यांच्यासाठी आवश्यक पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तपोवन येथे कायमस्वरूपी पोलिस चौकी कार्यान्वित करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हाधिकारी शर्मा यांच्यासह सर्व अधिकार्यांनी साधुग्रामच्या जागेची साधू, महंत यांच्यासमवेत पाहणी केली. नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे होणारा कुंभमेळा साधू, महंत आणि नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे कुंभमेळ्याशी संबंधित सर्व विकास कामे वेळेत पूर्ण होतील यासाठी प्रशासन नियोजन करीत असून, दीर्घ कालावधी लागणारी कामे पावसाळा संपताच सुरू करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले.
कपिला संगमाला भेट
जिल्हाधिकारी शर्मा यांच्यासह सर्व अधिकार्यांनी कपिला संगम येथे भेट देत रामसृष्टीची पाहणी करून आरती केली. आगामी कुंभमेळा स्वच्छ, पर्यावरणपूरक, सुरक्षित होईल, साधू, महंत यांच्या अडचणी सोडविण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. त्यामुळे साधू, महंत यांच्या अडचणी, समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील, असे आश्वासन साधू-महंतांना देण्यात आले.