महाराष्ट्राला संतांची फार मोठी देणगी संतपरंपरेच्या रूपाने मिळालेली आहे. महाराष्ट्रात जेवढे संत अवतार रूपाने प्रकट झाले, तितके संत कुठल्याही राज्यात झाले नाहीत, हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे. लोकजागृती करून समाज घडविण्याचे कार्य ज्या ज्या संतांनी केले त्या संत मालिकेतीलच एक महत्त्वाचे संत म्हणजे नरहरी सोनार. त्यांची पुण्यतिथी आज, दि. 4 फेब्रुवारी 2026 रोजी आहे. संत ज्ञानेश्वरांच्या समकालीनच श्री संत नरहरी महाराजांचे कार्यदेखील महत्त्वाचे आहे.
संत श्री नरहरी महाराज यांच्या वडिलाचे नाव अच्युतराव, तर आईचे नाव सावित्री असे होते. अच्युतरावांप्रमाणेच त्यांच्या पत्नी सावित्री गुणवान आणि शिवभक्त होत्या. अच्युतरावांचे पंढरपूर येथे सराफी दुकान होते. लग्नानंतर काही दिवसांनी आपल्या दुकानात सराफीच्या कामात मग्न असतानाच त्यांच्यासमोर भगवान शंकर प्रकटले आणि तुम्हाला एक गुणवान व शिवभक्तपुत्र प्राप्त होईल, असा आशीर्वाद त्यांनी दिला.
शके 1115 मध्ये अच्युतराव आणि सावित्री यांच्या पोटी श्री संतशिरोमणी नरहरी महाराज यांचा जन्म झाला. संत नरहरी महाराजांच्या बालमनावर उत्कृष्ट संस्कार, जीवनातील आदर्श यांच्या बिंबवणुकीबरोबरच शिवभक्तीचे महत्त्व ठसू लागले. दिवसेंदिवस त्यांची असणारी शिवभक्ती वाढतच होती. याच कालावधीत आपला परंपरागत सुवर्णकारितेच्या व्यवसायातही ते मागे नव्हते. सराफीच्या व्यवसायातही त्यांनी या लहान वयात चांगलीच गती दाखवली. नानाविध प्रकारचे सोने-चांदीचे अलंकार श्री नरहरी महाराज चांगल्या प्रकारे तयार करीत असत.
कालांतराने नरहरींचा विवाह गंगा नावाच्या कन्येशी झाला. नरहरींच्या धर्मपत्नीमुळे नरहरींच्या शिवभक्तीमध्ये आणखीनच वाढ झाली. या वाढीसाठी सर्वतोपरी मदत त्यांच्या पत्नीने केली. त्यांच्या शिवभक्तीतील वाढीबरोबरच त्यांचा वडिलोपार्जित व्यवसायदेखील आता चांगलाच नावारूपाला येत होता. या दोन्ही घटकांपैकी कुठेही त्यांचे दुर्लक्ष झाले असे नव्हते.
संत नरहरी महाराजांची शिवभक्ती ही थोड्या वेगळ्या प्रकारची होती. ती अशी की, ते शिवभक्ती सोडून इतर कुठल्याही देवाची भक्ती करीत नसत किंवा कुठल्याही देवाचे दर्शन घेत नसत. पंढरपूर येथे राहूनही त्यांनी विठोबाचे दर्शन घेतले नाही. सकाळ-संध्याकाळ ते फक्त महादेवाचीच पूजा करीत असत. याशिवाय आपला परंपरागत व्यवसाय करीत असतानादेखील फक्त ते शिवभक्तीच करीत असत.
संत नरहरी या कट्टर शिवभक्ताची परीक्षा घ्यायची असे एकदा श्रीहरीने ठरवले. एकदा दौलताबादवरून एक विठ्ठलभक्त सावकार नरहरी यांच्याकडे आला. त्या सावकाराने विठ्ठलाच्या कमरेला सोन्याचा कमरपट्टा बांधण्याचा नवस केला होता, त्या नवसाच्या पूर्णत्वाचा भाग म्हणून कमरपट्टा तयार करण्यासाठी हा सावकार नरहरी सोनारांकडे आला आणि कमरपट्टा बनवून द्या, असे नरहरींना सांगितले. सावकाराने विठ्ठलाच्या कमरेचे माप नरहरींच्या सांगण्याप्रमाने आणले. त्यानुसार नरहरींनी सुंदर कमरपट्टा बनविला. तो पट्टा घेऊन सावकार विठ्ठल मंदिरात गेला, तर तो पट्टा मोठा झाला. सावकार तो पट्टा लहान करण्यासाठी परत नरहरींकडे आला. पट्टा दुरुस्त केल्यानंतर तो विठ्ठलाच्या कमरेच्या मापापेक्षा फार लहान झाला. असे पट्ट्याच्या मापात लहान-मोठेपणा येण्याची क्रिया चार-पाच वेळा झाली. शेवटी सावकाराने नरहींना स्वतः विठ्ठल मंदिरात येऊन विठ्ठलाच्या कमरेचे माप घेण्याची विनंती केली; परंतु नरहरींच्या शिवभक्तीमुळे ते इतर कोणत्याही मंदिरात जात नव्हते आणि कुठल्या देवाचे दर्शनही घेत नव्हते. मी डोळ्यावर पट्टी बांधून विठ्ठल मंदिरात येईन, या अटीवर नरहरी महाराज सावकाराबरोबर विठ्ठलाच्या मंदिरात येण्यास तयार झाले. त्याप्रमाणे नरहरी महाराज स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून सावकाराबरोबर विठ्ठल मंदिरात आले. विठ्ठलाच्या कमरेचे माप घेण्यासाठी ते विठ्ठलाला चाचपू लागले तर त्यांच्या हातात पाच मुखे, सर्पालंकार, जटा व त्यात गंगा, आणि शंकराची पिंडी लागली. त्यांनी डोळे उघडले तर समोर विठ्ठलाची मूर्ती. डोळ्यावर पट्टी बांधली तर त्यांच्या हाताला पुन्हा शंकराची पिंडी लागत असे. असे सुरू असतानाचा विठ्ठल आणि शिव एकच आहेत, असा साक्षात्कार त्यांना झाला. ’हरिहर’ या दोन्हींतही एकाच परमात्म्याची शक्ती आहे, हे त्यांच्या लक्षात आले आणि आपली चूक त्यांच्या लक्षात येऊन ते विठ्ठलभक्तीत तल्लीन झाले. याविषयी त्यांचाच एक अभंग
शिव आणि विष्णू एकचि प्रतिमा
ऐसा ज्याच्या प्रेमा सदोदित
धन्य ते संसारी नर आणि नारी
वाचे हरि हर उच्चारिती
परमेश्वर हा एकच आहे. भेदाभेद व्यर्थ आहे, हे त्यांनी सांगितले आणि त्यांच्या भक्तिप्रवाहाने एक वेगळेच वळण घेतले. पंढरपूरच्या संतांच्या भक्त मेळ्यात नरहरी सामील होऊन अद्वैताच्या एक रूपाचे गुणगान गाऊ लागले. वारकरी संप्रदायाचे कार्य ते करू लागले. जो विठ्ठल त्यांनी पूर्वी कधी पाहिला नव्हता त्याचे गुणगान ते आता करू लागले.
या नर जन्माचे सार्थक माणसाने कसे करावे याचे सुंदर वर्णन त्यांनी आपल्या अभंगात केले आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याजवळ असावी, त्याचा संग्रह करावा असे माणसाला वाटते. या हव्यासातूनच पापाचा जन्म होतो; परंतु या हव्यासापायी जमा केलेल्या गोष्टींपैकी शेवटी काहीही बरोबर येत नाही, हे सांगताना ते म्हणतात.
देह जन्मला व्यर्थ,
झाले पापांचे पर्वत,
नाही केला दानधर्म,
शेवटी जन्म व्यर्थ गेला,
देह अवघा क्षणभंगुर,
दिसे स्वप्नवत सारे
नरहरी म्हणे शेवटी,
संगे न येई लंगोटी
आयुष्यभर जमवलेली मालमत्ता, पैसाअडका तर सोडाच, पण माणसाची लंगोटीदेखील आपल्याबरोबर शेवटी येत नाही, याचे मार्मिक विवेचन सदर अभंगातून त्यांनी केले. आपल्या व्यवसायातील वस्तू आणि हत्यारांना प्रतीक मानूनही त्यांनी अभंगरचना केलेली आहे. ती अशी…
देवा तुझा मी सोनार,
तुझे नामाचा व्यवहार
देह बागेसरी जाण,
अंतरात्मा नाम सोने
त्रिगुणांची करूनी मुस,
आंत ओतिला ब्रह्म रस
जीव-शिव करून फुंकी,
रात्रंदिवस ठोकाठोकी
अशा अभंगातून आपल्या व्यवसायात मग्न असतानाही त्यांचा भक्तीचा झरा अखंड वाहत असे. श्री संत शिरोमणी नरहरी महाराजांनी यासारख्या अभंगरचना मोठ्या प्रमाणावर रचल्या आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्यात सुरुवातीला लहानपणापासूनच भगवान शंकर यांच्यावर अभंगरचना केलेली दिसते. परंतु हरि-हर ऐक्याचा साक्षात्कार झाल्यावर मात्र विठ्ठलावरदेखील अभंगरचना त्यांनी केल्या. त्यांनी आपल्या अभंगातून मनुष्य जीवनाचे सार कशात आहे, हे पटवून देण्यासाठी विविध रूपकांचा वापर करीत सोप्या सोप्या भाषेत अभंगांची रचना केली आहे.
Saint Shri Narahari Maharaj, who connects the world and the divine