पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्कचा कानाडोळा
दिंडोरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील कोचरगाव येथे अवैध दारू विक्री सर्रासपणे सुरू असून, गावात नऊ ठिकाणी अवैध दारू विक्री सुरू आहे. याविरोधात येथील महिलांनी पोलीस ठाणे गाठत उपनिरीक्षक किसन काळे यांना निवेदन देत दारूबंदी करण्याची मागणी
केली.
गावातील अनेक तरुण दारूच्या आहारी जाऊन आपल्या जिवाला मुकले आहेत. दारूमुळे अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. गावातील दारू विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी अनेकवेळा निवेदने देण्यात आली. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या महिलांनी दिंडोरी येथे पोलीस ठाणे गाठत दारूबंदीची मागणी केली. यावेळी सरपंच कल्पना टोंगारे, उपसरपंच गोरखनाथ लिलके, पोलीसपाटील सीता टोंगारे, अलकाबाई खाडे, मंजुळा निंबेकर आदींसह महिला उपस्थित होत्या.
दिंडोरीच्या पश्चिम भागात दारू विक्रीची दुकानेच नाही. तरीही अवैध दारू विक्री करणार्यांकडे दारूचे बॉक्स येतातच कसे, राज्य उत्पादन शुल्क विभागाने दुकानदार बॉक्स विक्रीची परवानगी दिली तर नाही ना? असा प्रश्न यावेळी महिलांनी उपस्थित केला. दारूबंदी करण्याचे गावाने ठरविले आहे. दारू विक्री करणार्या महिलांनी नऊ दारू विक्रेत्याची नावे दिली आहे. त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे पोलीस उपनिरीक्षक किसन काळे यांनी सांगितले.
अन्यथा उपोषणास बसणार
आजपर्यंत दिंडोरी पोलिसांना दोनदा निवेदने दिली. नाशिक ग्रामीण पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांना निवेदन दिले, मात्र गावात राजरोसपणे अवैध दारूविक्री सुरू आहे. आज दिलेल्या निवेदनावर कारवाई झाली नाही तर नागरिक उपोषणाला बसतील.
– कल्पना टोंगारे, सरपंच, कोचरगाव