सामाजिक-वैज्ञानिक प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सामाजिक-वैज्ञानिक प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक:- सामान्य जीवनात सामाजिक आणि वैज्ञानिक गोष्टींचे विशेष महत्व सांगणार्‍या भित्तीपत्रक आणि रांगोळी प्रदर्शनाला एचपीटी आर्टस् अँड आरवायके सायन्स महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.



महाविद्यालयाच्या शतकपूर्व समारंभाचा एक भाग म्हणून शनिवारी सामाजिक-वैज्ञानिक प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनात भित्तीपत्रक आणि सुबक रांगोळ्यांच्या माध्यमातून आरोग्य, असाध्य आजार, खाद्यपदार्थ, साथीचे रोग, आहार, स्वच्छता, पाणी, प्रदूषण, बदलते हवामान आणि जागतिक तपमान, आपत्ती व्यवस्थापन, जैवविविधता, वनस्पतींचे महत्व इत्यादी विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रबोधन केले. त्याचप्रमाणे नाशिकचा सांस्कृतिक, राजकीय, पौराणिक, ऐतिहासिक वारसा यांवरही प्रदर्शनात प्रकाशझोत टाकण्यात आला. विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्या माहिती आणि ज्ञानात या प्रदर्शनातून भर पडली.



महाविद्यालयातील ‘द क्युरिअस माईंडस्’ सायन्स असोसिएशनच्या वतीने भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी कल्पकतेचा वापर करुन साध्या-सोप्या भाषेत विविध विषयांची मांडणी केली. सहकारी विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे शंकासमाधानही त्यांनी केले. विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या गर्दीने प्रदर्शन प्रांगण फुलून गेले होते. सायन्स असोसिएशनच्या समन्वयक डॉ. लीना पाठक, संयोजक प्रा. एस. जी औटी, प्रा. सी. एस. जावळे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी विषयांची मांडणी केली.



प्रदर्शनाचे उद्घाटन गोखले एज्युकेशन सोसायटीचे विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते रामशिष भुतडा

उपस्थित होते. प्राचार्या डॉ. मृणालिनी देशपांडे यांनी प्रास्ताविकात प्रदर्शनाची संकल्पना मांडली. यावेळी उपप्राचार्य डॉ. प्रणव रत्नपारखी आणि डॉ. लोकेश शर्मा, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. आनंदा खलाणे, सांस्कृतिक मंडळाच्या प्रमुख डॉ. विद्या पाटील आदी उपस्थित होते.

DSC01847.JPG

One thought on “सामाजिक-वैज्ञानिक प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *