आयारामांना पायघड्या; निष्ठावानांना संतरज्या!

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला वेग आला आहे. प्रत्येक जण सेफ झोनसाठी कोलांटउड्या मारताना दिसून येत आहे. त्यातही सत्तासुंदरी सर्वांनाच खुणावत असल्याने व राजकीय पक्षांनाही आपले स्थान पक्के करायचे असल्याने येणार्‍या नेत्यांना पायघड्या घातल्या जात आहेत. मात्र, यामुळे वर्षानुवर्षे पक्षाशी एकनिष्ठ असलेले जुने कार्यकर्ते, नेत्यांवर नवीन आयारामांमुळे भविष्यात अडचण निर्माण होणार आहे. आम्ही फक्त सतरंज्याच उचलायच्या का? असा तक्रारीचा सूर आतापासूनच काही जण आळवताना दिसत आहेत.

येत्या काही महिन्यांत राज्यात महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष, नेते व कार्यकर्ते अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतील घवघवीत यश मिळाल्यामुळे राज्यातील विरोधी पक्षांचा सुपडा साफ झाला. परिणामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही राज्यातील सत्ताधारी महायुतीकडून शत-प्रतिशतसाठी प्रयत्न केले जात आहेत. विरोधी पक्षांतील नेत्यांनाही सत्ताधारी पक्षात नसलो तर निवडून येऊ की नाही, याची शाश्वती नसल्याने सत्ताधारी पक्षांतील भाजप, शिवसेनेत (शिंदे गट) जात स्वतःचे स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परिणामी राज्यात गेल्या काही दिवसांपासून पक्षांतराला वेग आला आहे. विरोधी पक्षांतून सत्ताधारी पक्षांत प्रवेश करणार्‍यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सत्ताधारी पक्षांकडून विरोधी पक्षांतील नेत्यांनी आपल्या पक्षात यावे म्हणून पायघड्या घालण्यात येत असल्याचे चित्र आहे. जिंकून येण्याचे मिरिट हीच अट ठेवत विरोधी पक्षांतील प्रभावशाली नेत्यांना पक्षात घेण्याची जणू स्पर्धा सध्या रंगल्याचे दिसत आहे.
नाशिक शहराच्या राजकारणात तर सद्या पक्षप्रवेशाचे सोहळेच जास्त प्रमाणात होत आहेत. ठाकरे गटातून हकालपट्टी झाल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. बडगुजर यांच्यासह माजी मंत्री बबनराव घोलप, अशोक मुर्तडक, माजी महापौर नयना घोलप यांनीदेखील भाजपमध्ये प्रवेश केला, तर शिवसेना ठाकरे गटातूनच माजी नगरसेविका किरण दराडे, विधी समितीच्या माजी सभापती सीमा निगळ, माजी नगरसेवक पुंजाराम गामणे, पुंडलिक अरिंगळे यांनी शिवेसना शिंदे गटात प्रवेश केला. आता शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक विलास शिंदे यांच्यासह आठ माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार आहे. गेल्या महिन्यात मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली मनसेतही ग्रामीण भागातील नेते, कार्यकर्त्यांनी प्रवेश केला होता. आगामी काळातही मोठेे पक्षप्रवेश भाजपमध्ये होणार असल्याचे कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहेच.
निवडणुकीच्या दृष्टिकोनातून प्रबळ नेते पक्षात येत असतील तर पक्षाची निश्चितच त्या भागात, त्या प्रभागात ताकद वाढते. पक्षवाढीसाठी इतर पक्षांतील नेत्यांना पक्षात घेणे हे सर्वच पक्षांतील वरिष्ठांचे धोरण आहे. मात्र, याच धोरणामुळे वर्षानुवर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करणार्‍या निष्ठावान नेते, कार्यकर्त्यांवर मात्र अन्याय होत असल्याचे चित्र आहे. पक्षाची ताकद नसताना आंदोलन करत पक्षाची ध्येयधोरणे ज्या कार्यकर्ते, नेत्यांनी जनतेपर्यंत पोहोचवत पक्ष जिवंत ठेवला, अशा कार्यकर्त्यांवर इतर पक्षांतून आलेल्यांंमुळे अडगळीत पडून राहण्याची वेळ आली आहे. ज्यांच्याविरुद्ध लढत पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न वर्षानुवर्षे केला आज तेच नेते पक्षात येत असल्याने त्यांची हुजरेगिरी करण्याची वेळ येत असल्याने निष्ठावान कार्यकर्तेे, नेत्यांची घुसमट होत आहे. पक्षांकडून निष्ठावान कार्यकर्त्यांच्या नाराजीची दखलही घेतली जात नसल्याचे चित्र आहे. परिणामी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या सत्ताधारी पक्षांत विरोधी पक्षांतून येणार्‍यांची संख्या जरी मोठी असली, तरी यामुळे पक्षात जुने विरुद्ध नवे असा वाद उफाळून येत आहे. यातून अंतर्गत गटबाजीला खतपाणी मिळत आहे.
सत्ताधारी भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात विरोधी पक्षांतून येणार्‍यांचा ओघ मोठा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येतील तसा पक्षांतराला वेग येईल. मोठमोठे पक्षप्रवेशही होतील. एकीकडे इतर पक्षांतून नेते येत असले, तरी पक्षातील जुन्या नेत्यांची वाढणारी नाराजी दूर करण्याचाही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना प्रयत्न करावा लागणार आहे. जुने व नव्यांचा समन्वय साधला तर विधानसभा निवडणुकीप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीला यश मिळेल. हा समन्वय साधणे शक्य झाले नाही, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधी पक्षांपेक्षा पक्षांतर्गत गटबाजीचा सामना करणे महायुतीतील सर्वच घटक पक्षांपुढील मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे इतर पक्षांतील नेते घेऊन पक्षाची वाढ होणार की, अंतर्गत गटबाजीचा पक्षाला फटका बसणार, हे निवडणुकांनंतरच स्पष्ट होणार आहे.

अश्विनी पांडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *