सराफ बाजाराकडे येणाऱ्या मार्गावरील अडथळे दूर करा – सराफ असोसिएशनचे पोलिसांना साकडे

सराफ बाजाराकडे येणाऱ्या मार्गावरील अडथळे दूर करा

– सराफ असोसिएशनचे पोलिसांना साकडे

नाशिक – विशेष प्रतिनिधी
नवरात्रोत्सव, दसरा व आगामी दिवाळी पर्व अशा सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सराफ बाजाराकडे येणाऱ्या मार्गांवर कायमस्वरुपी तोडगा काढून अडथळे दूर करण्याची मागणी दि नासिक सराफ असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांना यासंदर्भातले निवेदन देण्यात आले आहे.
सणासुदीच्या दिवसांना सुरवात झाली असून सोनेचांदी खरेदीसाठी ग्राहकांची पावले नाशिकच्या पारंपारीक सराफ बाजाराकडे वळू लागली आहे. आगामी सणासुदीच्या काळात या गर्दीमध्ये निश्चितच वाढ होणार असून ग्राहकांना सराफ बाजारात येण्यासाठी मोठे दिव्य पार करावे लागत आहे. अवैध फेरीवाल्यांच्या त्रासामुळे येथे क्षणोक्षणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. याप्रश्नी कायमस्वरूपी तोडगा काढून सराफ बाजाराकडे येणारे मार्ग मोकळे करावे, अशी मागणी दि नासिक सराफ असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष गिरीश नवसे यांनी केली आहे. सोमवारी ( दि.१६ ) अध्यक्ष गिरीश नवसे यांनी
पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांची भेट घेऊन या प्रश्नांची गांभिर्याने दखल घ्यावी अशा आशयाचे निवेदन दिले आहे. यावेळी क्लॅाथ मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष नरेश पारखही उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेस पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच सराफ बाजार व परिसराची पाहणी करून हा प्रश्न सोडविणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *