वाहनचालकांना खड्डयांमुळे मार्ग काढताना मोठी कसरत
वासाळी : वार्ताहर
इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद ते वासाळी रस्त्याची खड्डयांमुळे पुरती वाट लागली आहे. वाहनचालकांना खड्डयांमुळे मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागते. या खड्डयांमुळे वाहनांची अवस्था खिळखिळी झाली असून, वाहनचालकांचेही पाठीचे दुखणे वाढले आहे. जिल्ह्याच्या अखेरच्या सीमेवर आलेल्या रस्त्यावर रस्ता कमी आणि खड्डे जास्त असल्यामुळे चालकांचे कमरेचे दुखणे वाढत आहे.
टाकेद-बांबळेवाडी रस्त्याची अवस्था पावसाने खराब झाली आहे. हा रस्ता पर्यटन रहदारीचा असून, सर्वतीर्थ टाकेद आणि कळसूबाई शिखर, शेंडी-भंडारदरा, भावली धरण, तसेच इगतपुरी- कसारा- मुंबईकडे जाण्यास मोठी रहदारी असते. नाशिक येथून येणार्यांना हा जवळचा मार्ग आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर पावसाचे पाणी साचून राहिले असल्याने त्यातून वाहने फार जपून चालवावी लागतात. त्यामुळे अपघात होण्याचा मोठा धोका आहे.
पावसाळा आला की खड्डे वाढलेच समजा, अशी या रस्त्याची अवस्था झाली आहे. लाखो,कोटींच्या विकासकामांचे दावे करणार्या प्रशासनाने रस्त्यावरील खड्डयांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसत आहे. कामाची दर्जाहीनता आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, यावर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. प्रत्यक्षात रस्त्यावर खड्डे कमी होण्याऐवजी दिवसागणिक वाढतच चालले आहेत. दिवसागणिक रस्ते विकासाचे जाळे विस्तारत समृद्धीसह विविध महामार्ग प्रगतिपथावर नेणार्या, आधुनिकतेकडे वाटचाल करीत मोनो, मेट्रो आणि बुलेट ट्रेन चालविणार्या महाराष्ट्रात आजची ग्रामीण भागाकरिता दळणवळणासाठी सुविधा जटिल आहे. डिजिटल भारताचे स्वप्न आपण सारेच पाहत आहोत. देशाचा विकास होत असल्याचा दावा केंद्र सरकार करत आहे. पण ग्रामीण भागातील परिस्थिती बिकट आहे.