विविध विकासकामे कोण पूर्ण करणार?
सटाणा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल 2016 नंतर 2025 मध्ये वाजले आहे. तब्बल नऊ वर्षांनी निवडणुका आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यात भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट या तिन्ही पक्षांची राज्यात एकत्र सत्ता असून, मात्र स्थानिक स्वराज्य निवडणुकीत सटाणा नगरपालिकेत हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर विरोधक म्हणून उभे राहिले आहेत. पालिकेच्या निवडणुकीत पक्षांच्या
फाटाफुटीनंतर प्रथमच होणारी ही निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
सटाणा पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज भरण्याच्या नाट्यमय घडामोडीनंतर भारतीय जनता पार्टीकडून नगराध्यक्षपदासाठी योगिता सुनील मोरे यांना तिकीट देण्यात आले. शिवसेना शिंदे गटाकडून हर्षदा राहुल पाटील यांना तिकीट देण्यात आले व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अर्चना दिनेश सोनवणे यांना तिकीट देण्यात आले. रूपाली परेश कोठावदे भारतीय जनता पार्टीकडून तिकिटासाठी अग्रही होत्या, मात्र पक्षाने त्यांना डावलल्याने त्यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल असल्याने त्यांच्या भूमिकेकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे. डॉ. विद्या मनोहर सोनवणे, आशाबाई नितीन सोनवणे यांना पक्षाने तिकीट दिले असते तर हेसुद्धा नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढणार होते, मात्र त्यांना पक्षाचे तिकीट मिळाले नाही. हे माघार घेता की काय हे माघारीनंतरच कळू शकते.
येथील नगरपरिषदेत दि. 25 डिसेंबर 2016 पासून दि. 25 डिसेंबर 2021 पर्यंत शहर विकास आघाडी आणि भाजप युतीची सत्ता राहिली. थेट नगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीचे सुनील मोरे निवडून आले होते. त्यांच्यासमवेत आघाडीचे सहा नगरसेवकही निवडून आले होते. भाजपचेही सहा नगरसेवक निवडून आले होते. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार बाळासाहेब सोनवणे दुसर्या स्थानावर राहिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने पाच जागांवर, तर काँग्रेसने दोन जागांवर विजय मिळवला होता व अन्य दोन जागा अपक्षांनी मिळविल्या होत्या. भाजप, शहर विकास आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना अशी बहुरंगी लढती झाल्या होत्या. निवडणुकीनंतर शहर विकास आघाडीने भाजपला सोबत घेत पाच वर्षे कारभार चालवला. डिसेंबर 2021 मध्ये कार्यकाळ संपल्यानंतर निवडणूक होणे अपेक्षित होते, मात्र आतापर्यंत पालिकेत प्रशासकीय राजवट राहिली. प्रांताधिकारी यांनी प्रशासक म्हणून जबाबदारी सांभाळली. या चार वर्षांत शहरातील विकासाची सर्व धुरा प्रशासकीय यंत्रणेवर विसंबून राहिली.
अनेक विकासकामे अपूर्ण
संत शिरोमणी देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. भूमिपूजन करून चार वर्षे नऊ महिने होऊन गेली असतानाही अद्याप शहराच्या वैभवासाठी स्मारकाचे काम अपूर्णच आहे. शहरासाठी संजीवनी ठरणार्या योजनेला खासदार सुभाष भामरे यांच्या प्रयत्नातून पुनंद पाणीपुरवठा योजनेची मंजुरी सटाणा पालिकेला मिळाली. त्यानंतर पाणीपुरवठा योजनेचे प्रत्यक्षात काम पूर्ण झाले, असे जनतेला सांगण्यात आले व जलपूजन सोहळा मोठ्या धुमधडाक्यात करूनसुद्धा पुनंद पाणीपुरवठा योजनेचे काम अपूर्ण दिसत आहे. शहरासाठी डोकेदुखी ठरलेली वाहतूक कोंडी कायमस्वरूपी केव्हा मोकळी होईल. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेले राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्णच, यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्णच दिसत आहे. सटाणा-नामपूर रस्त्याचे काँक्रिटीकरणासह दुभाजक विद्युतीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. सटाणा-नामपूर रस्त्याचे काँक्रिटीकरण झाले असता, त्या रस्त्यावर दुभाजक दिसून येत नाहीत तसेच रस्त्याच्या कडेला विद्युतीकरणासाठी पोल उभे करण्यात आले. त्या पोलवर दिवे बसवण्यात आले नाहीत.
विविध समस्या अद्याप कायम
महानगरांच्या धर्तीवर अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून शहरवासीयांसाठी रिंगरोडचे भूमिपूजन करण्यात आले होते. भाक्षी रोड ते नामपूर रोड ते चौगाव रिंगरोडचे काम काही ठिकाणी झाले तर काही ठिकाणी अपूर्णावस्थेत दिसून येत आहे. सटाण्यातील वीजवाहिन्या भूमिगत करण्याचा प्रस्ताव होता, मात्र शहरात देवमामलेदार यशवंतराव महाराज रथ मार्ग या ठिकाणी कुठेही भूमिगत विद्युत केबल टाकण्यात आल्या नसल्याचे दिसून येत आहे. तसेच मोकाट जनावरांचा प्रश्न असो किंवा दूषित पाण्याचा प्रश्न, वाढीव घरपट्टी असो अशा विविध समस्यांबरोबर विकासकामे अपूर्णावस्थेत आहेत. शहरातील नागरिकांना प्रश्न पडला आहे की, तत्कालीन नगराध्यक्षांच्या काळात कुठलीही विकासकामे पूर्ण केलेली दिसून येत नाही तसेच येणार्या भावी नगराध्यक्षांच्या काळात विकासकामे पूर्ण होतील का पुन्हा एकदा भूलथापांना आपण बळी पडू, असे प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होऊन उलटसुलट चर्चांना वाव आलेला आहे.
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…