सातपूरचा पोलिस वीस हजाराची
लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
नाशिक : प्रतिनिधी
भंगार बाजारातील व्यावसायिकाला गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन अटक टाळण्यासाठी वीस हजारांची लाच घेताना सातपूर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी अनंता बळवंतराव महाले (38) यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रंगेहाथ पकडले. तक्रारदार यांचा भंगाराचा व्यवसाय आहे. तक्रारदार यांचे भंगार दुकान हे सातपूर पोलीस स्टेशन हद्दीत येत असून पोलिस कर्मचारी महाले यांनी तक्रारदार यांचा भावाला त्यांचे भंगार दुकानातून काही कारण न सांगता चौकशी साठी सातपूर पोलिस ठाणे येथे घेऊन गेले व तक्रारदार यांना फोन करून तुला व तुझ्या भावाला एखाद्या गुन्ह्यात अटक करून टाकू, जर गुन्हा दाखल करून घ्यायचा नसेल तर तुम्ही आम्हाला 25 हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली.त्यानंतर तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. सापळा अधिकारी निलिमा डोळस, हवालदार संदीप वणवे, पोलिस नाईक संदीप हांडगे, सुरेश चव्हाण यांच्या पथकाने लावलेल्या सापळ्यात अनंता महाले हे वीस हजारांची लाच घेताना अडकले.त्यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. अधिक तपास पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.