नाशिक : प्रतिनिधी
सार्वजनिक वाचनालयाच्या पंचवार्षिक निवडणुकीला आता रंगत चढत आहे. शुक्रवारी सावानाच्या निवडणुकीसाठी आलेल्या अर्जांची छाननी करण्यात आली. यात अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी भरण्यात आलेले सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले. मात्र कार्यकारणी सदस्य पदासाठीचे सहा अर्ज बाद झाले आहेत. आज वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
अध्यक्षपदासाठी एकूण 4, उपाध्यक्ष पदासाठी 5 तर कार्यकारिणी सदस्य पदासाठी 81 असे एकूण 90 अर्ज दाखल झाले होते. तर सावाना निवडणुकीसाठी १२८ अर्जाची विक्री झाली त्यापैकी ९० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. कार्यकारणी सदस्य पदासाठी करण्यात आलेल्या 81 अर्जापैकी सहा अर्ज बाद झाल्याने आता 75 जण रिंगणात आहेत. मात्र माघारी नंतरच निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
अध्यक्षपदासाठी वसंतराव खैरनार, दिलीप फडके, मकरंद सुखात्मे आणि विलास पोतदार हे निवडणुक लढवत आहेत. तर तर उपाध्यक्ष पदासाठी सुनील कुटे, मानसी देशमुख, दिलीप धोंडगे, वैद्य विक्रांत जाधव, बाळासाहेब गुंजाळ हे निवडणुक लढवत आहेत. सावाना निवडणुकीसाठी २३ एप्रिलला वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
२४ ते २६ एप्रिलला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे.तर
२७ एप्रिलला उमेदवारांच्या माघारीनंतरची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
8 मे रोजी मतदान तर
९ मे रोजी अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी मतमोजणी, आणि १० मे रोजी कार्यकारी मंडळाच्या सदस्यपदासाठी झालेल्या मतांची मोजणी करण्यात येणार आहे.